दिवसभरात 22,854 नवे बाधित : सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत असून, दररोज मोठय़ा प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. महाराष्ट्राबरोबरच केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही बाधितांचा आकडा वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सर्वाधिक संसर्ग असणाऱया सहा राज्यांमध्ये तब्बल 85.91 टक्के इतके रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत अखेरच्या चोवीस तासात देशात 22 हजार 854 इतके नवे बाधित सापडले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 13 हजार 659 नवीन रुग्णांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासात देशभरात 22 हजार 854 नवे रुग्ण सापडल्यामुळे एकंदर बाधितांचा आकडा 1 कोटी 12 लाख 85 हजार 561 वर पोहोचला आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासांमधील आकडेवारी पाहता देशात कोरोनामुळे 126 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 58 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात बुधवारी दिवसभरात 18 हजार 100 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून आतापर्यंत 1 कोटी 9 लाख 38 हजार 146 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजूनही देशात 1 लाख 89 हजार 226 सक्रिय रुग्ण असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात चिंताजनक वाढ
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 13 हजार 659 नवीन रुग्ण आढळले. 7 ऑक्टोबरनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. राज्यात बुधवारी 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 610 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.34 टक्के इतका आहे. दिवसभरात 9 हजार 913 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 99 हजार 207 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.21 टक्के इतके झाले आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 240 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 22 लाख 52 हजार 57 लोकांना लागण झाली आहे.
ब्राझीलमध्ये दिवसात 2 हजार मृत्यू
ब्राझीलमध्ये 24 तासात 2 हजारहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा संसर्ग वाढल्यानंतर देशातला हा एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. जगभरात अमेरिकेनंतर कोरोना रुग्णांच्या मृतांच्या आकडेवारीत ब्राझील दुसऱया क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत तब्बल 2 लाख 70 हजार 917 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बुधवारी एका दिवसात 2,286 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. वाढत्या संसर्गामुळे ब्राझीलमधील बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये आरोग्य यंत्रणांवर प्रचंड दबाव आला आहे. रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर दडपण असल्याची कबुली सार्वजनिक आरोग्य केंद्र फिओक्रूझ यांनी दिली आहे.









