प्रतिनिधी / नागठाणे :
देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्व मोठे आहे. सहकाराच्या माध्यमातून वंचित व दुर्लक्षित घटकांच्या उद्धाराचे काम करणे गरजेचे झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.
‘सहकारातून समृद्धीकडे’ या उपक्रमाअंतर्गत नुकतीच ऑनलाईन पहिली सहकार परिषद सातारा येथे पार पडली. या ऑनलाईन सहकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. शाह म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेऊन स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. देशातील आर्थिक दुर्बल घटक, वंचित, दलित, शेतकरी व महिला यांच्या विकासाचा मार्ग केवळ सहकाराच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यासाठी सहकार क्षेत्रात काम करताना त्यात पारदर्शीपणा महत्वाचा आहे. देशात सहकार क्षेत्रात यापूवीही काम सुरू होते. मात्र, आता त्याच्या दिशा व्यापक कराव्या लागणार आहेत. सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य देशातील प्रत्येक गावात रुजवून प्रत्येक गाव समृद्ध बनविणे व त्यातूनच देश समृद्ध बनविणे हीच या सहकाराची प्रमुख भूमिका आहे असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
नाबार्डच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन सहकार परिषदेला सातारा जिल्हा खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी, अधिकारी, सर्व तालुक्यातील खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.