सामाजिक जागृती करण्याची आवश्यकता, नियमांचे कठोर पालन अनिवार्य
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना पंतप्रधान मोदी यांनी लसीकरण प्रक्रियेचा आढावा एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिवांसह अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनावर स्थायी नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक जागृती आवश्यक आहे. तसेच कोणतेही निमित्त पुढे न करता नियमांचे कठोर पालन करणे प्रत्येकाने अनिवार्य मानले पाहिजे, अशा अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी अधिकाऱयांना केल्या.
कोरोना संपविण्यासाठी जनसहभाग आणि जनआंदोलनाची आवश्यकता आहे. चाचणी, पाठपुरावा आणि उपचार ही त्रिसूत्री कसोशीने उपयोगात आणल्यास कोरोनावर नियंत्रण मिळणे शक्य आहे. प्रत्येक व्यक्ती आणि संपूर्ण समाजानेही या कोरोना नियंत्रण प्रक्रियेत योगदान पेले पाहिजे. कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असे परिवर्तन आपल्या जीवनशैलीत करण्यासाठी जनआंदोलन करावे लागेल. त्यासाठी सरकारप्रमाणेच सामाजिक संस्था आणि मान्यवरांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधान मोदींनी केले.
लसीकरण वेग वाढणे आवश्यक
देशात आतापर्यंत सहा कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. हा वेग वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याला आता लोकांचे प्रतिसादही मिळताना दिसतो. तथापि, अद्याप लसीकरणाने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. लोकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे. भारतीय लसी पूर्णतः निर्धोक आणि प्रभावी आहेत, असे आवाहनही सरकारने केले आहे.









