प्रतिनिधी / आचरा:
कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करून भाविकांच्या उपस्थितीत इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या गणेश मूर्तीचे 21 व्या दिवशी भावपूर्ण वातावरणात आचरा पारवाडी येथील नदीवर विसर्जन करण्यात आले.
संस्थानकालीन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव हा नेहमीच 42 दिवसांचा साजरा होतो मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने गणपतीचे विसर्जन 21 दिवसांनी करायचे ठरविले होते. दरवर्षी या गणेश मूर्तीचे आचरा येथे समुद्रात विसर्जन करण्यात येते. तत्पूर्वी, श्री देव रामेश्वर मंदिर ते आचरा पिरावाडी समुद्र किनारा अशी भव्य शाही मिरवणूक मिरवणूक काढण्यात येते. यंदा मात्र महामारीमुळे गणेश मूर्तीचे विसर्जन आचरा समुद्रात न करता, जवळच असलेल्या नदीवर करण्यात आले. सर्वाधिक दिवस चालणारा गणेशोत्सव म्हणून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. शुक्रवारी दुपारी 1 वा. श्रींच्या मूर्तीची उत्तर पूजा करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करत संस्थांनी थाटात ताशा-ढोल-सनईच्या सुरेल आवाजात मिरवणूक काढण्यात आली. मार्गावरील प्रत्येक घरातील पुरुष, महिला भगिनींने आपल्या उंबरठय़ावरच राहून आचऱयाच्या राजाचे दर्शन घेतले. सायंकाळी गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नदी किनारी काही भाविकांनी हजेरी लावली होती. आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









