अध्याय चौदावा
भक्तियोगाबद्दल सविस्तर सांगताना भगवंत उद्धवाला म्हणाले, भक्तियोग म्हणजे सगुणोपासना करणे. त्यासाठी माझ्या सर्वांगसुंदर मूर्तीवर ध्यान केंद्रित करावे. सर्व अवयव मनात ठसले की, माझ्या मुखावर लक्ष एकवटावे. त्यातही हळूहळू माझ्या स्मितात मन गुंतवावे. त्याची सवय झाली की, त्या स्मितामुळे जो आनंद घन दाटून येतो त्यात हरवून जावे. याप्रमाणे माझे ध्यान साधू लागले की, चित्तात केवळ मीच साठवला गेल्याने मनात येणारे नाना प्रकारचे संकल्पविकल्प नाहीसे होऊन माझ्याबरोबर अद्वैत साधले जाऊन सर्व प्रकारच्या त्रिपुटी नाहीशा होतात. इतकेच नव्हे तर अद्वैत साधल्यामुळे महायोग किंवा समाधिसुखाचा सुखोपभोग किंवा जीव आणि शिव यांचे आत्मैक्मय या गोष्टीही शिल्लक रहात नाहीत. तेथे बोध कशाचा? बोधकता कशाची? बद्धता कशाची आणि मुक्तता तरी कशाची? ब्रह्माचे नाव ही गोष्टसुद्धा पूर्णपणे लयास जाते. सत्, चित् आणि आनंद या नावाचा संबंधसुद्धा मला मायेनेच लावला आहे. त्याबद्दलही स्पष्टपणे सांगतो ऐक. असत (मिथ्या) पणा काढून टाकण्यासाठी श्रुति मला संत असे म्हणतात. मला ज्ञानस्वरूप म्हणतात. तसेच दुःखाचा संबंध माझ्या ठिकाणी येऊ नये म्हणून मला ‘परमानंद’ असे म्हणतात. ह्याप्रमाणे ‘सच्चिदानंद’ असे मला म्हणणे हाही विद्येच्या दृष्टीने विपरीत बोधच होय. जेथे असंतपणा मुळीच नाही तेथे ‘संत’ म्हणण्यात काय अर्थ आहे? अज्ञानच मुळी जेथे नाही, तेथे ‘ज्ञानमय’ असे तरी कोण म्हणणार?
दुःखाचा जेथे लेशही उरत नाही तेथे सुख म्हणून वेगळे काय असणार? त्यामुळे माझ्या नामामुळे सुख मिळते किंवा रुपाच्या दर्शनामुळे आनंद होतो ही केवळ कल्पना उरते. त्रिपुटीचे भान निखालस नाहीसे होणे, यालाच ‘तीव्र ध्यान’ असे म्हणतात. त्या ध्यानातच माझे भजन करून साधक आत्मानंदाला पात्र होतात. अशाप्रकारे या माझ्या ध्यानपद्धतीमुळे संसार विलयास जातो. आणि उद्धवा! आत्मस्वरूपाच्या निश्चयाने माझे शुद्धस्वरूपच शिल्लक राहते. त्या स्वरूपामध्ये सुख नाही आणि दुःख नाही. सत् आणि असत् यांचा उल्लेखच नाही किंवा त्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान अशा कल्पनांचा काही अडथळाही नाही.
त्यात नाम, रूप, गुण, मी-तूपणाची खूण, विद्या-अविद्येचे भान यापैकी काहीएक रहात नाही. सर्वत्र आनंदघन असे आत्मस्वरूपच राहिलेले असते. अशा रीतीने अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्तीने देवांनी उद्धवाला आत्मानुभवाने भक्तिसुखाचे झोके दिले आणि म्हणाले, उद्धवा! ही माझी भक्ती अंतःकरणात बिंबली असता सर्व सिद्धींचा लाभ होतो यात मुळीच संशय नाही हे पक्के लक्षात ठेव. भक्तीपासून सुखस्वरूपी दूध भजनमार्गाने काढून घेऊन व त्याचे मंथन करून जे सार निघते, ते श्रीकृष्णाने या चौदाव्या अध्यायात उद्धवाला दिले. ह्यात देव स्वमुखाने असे म्हणतात की, ‘अहो! मी केवळ भक्तीलाच वश आहे. इतर सर्व उपाय गौण आहेत’. सर्व योगांचे योगसंग्रहस्थान, वेदांताचे मुख्य भांडार आणि सर्व सिद्धीतील परम रहस्य म्हणजेच खरोखर हरिची भक्ती होय. आत्मभाग्याचा खराखरा लाभ, महत्सुखाची खरीखरी आवड आणि सर्व गोष्टीतील गोडी म्हणजेच श्रीहरीची एकनि÷ भक्ती होय. भक्तीपूर्वक भगवद्?भजन केल्यामुळे चांडाळही पावन झाले. ज्याने आपले मन भक्तीला विकले, त्याच्या आधीन देव सदासर्वकाळ असतो.
एकनाथांनी मुक्तीचीदेखील उपेक्षा करून जनार्दनांच्या ठिकाणीच एकनि÷ भक्ती धरली आहे, तेव्हा त्यांच्याच प्रसादाने नाथांना भगवत्प्राप्ती ही रात्रंदिवस खेळण्याप्रमाणे वश होऊन राहिली आहे.
नाथ जरी त्या भगवत्प्राप्तीचा स्वीकार करीत नसले तरी ती आपण होऊनच घरात घुसते. अशा गुरुभक्तीच्या योगाने देव सर्वोपरी भुलून गेला आहे. सर्व भजनात मुख्य भजन म्हणजे ‘राम’ या दोन अक्षरी नावाने नेहमी गर्जना करणे. ज्याला भगवत्प्राप्ती पाहिजे असेल त्याने भक्तीची उपेक्षा करू नये. जो श्रीहरीचे अखंड नामस्मरण करतो त्याच्यापाशी देव निरंतर ति÷त असतो.
(अध्याय चौदावा समाप्त)







