वार्ताहर/ ताम्हाने
एस.टी.आणि बेस्ट प्रशासनाने भत्ते न दिल्याने वैतागलेल्या देवरूख आगाराच्या एका कर्मचाऱयाचा ‘आत्महत्या करतो’, असा विडीओ वायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत कर्मचाऱयाची बाजू घेवून समस्या सोडवण्याकरिता भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवरुख आगारावर धडक देत आगारप्रमुखांना धारेवर धरले.
कर्मचारी जर मानसिक तणावात काम करित असतील, तर प्रशासनाने तातडीने कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. यातून प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला असून, कोणतीही दुर्घटना घडल्यास आगारप्रमुख आणि पालकमंत्री जबाबदार असतील, असा इशारा भाजप संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी दिला. यावेळी आगारप्रमुखांशी चर्चा करताना, त्या म्हणाल्या की, बेस्टसाठी 52 कर्मचारी देवरूखातून पाठवले आहेत, त्यामुळे कर्मचारी कमी झाले आहे, सगळा ताण येथील कर्मचाऱयांवर पडला असून, ही अवस्था महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या धोरणामुळे निर्माण झाली आहे.
मुंबईतून कर्मचाऱयांना 17 दिवसांनी पण पैसे दिले गेले नाही, अजुनही तो कर्मचारी देवरूखला आलेला नाही, आगार व्यवस्थापक यांचा फ़ोन उचलत नाही, ही दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. मागील महिन्यात एका कर्मचारीने आत्महत्या केली असून, हा कर्मचारी आत्महत्येचा प्रयत्न करीत थांबला. एस.टी.प्रशासन रसातळाला गेलेले असून, पालकमंत्री अनिल परब हे आपला मुंबईतील मतदारसंघ सांभाळण्यावर भर देत आहेत, रत्नागिरीकडे पूर्ण पाठ फिरवली आहे. त्यामुळे आजच्या घटनेने एस.टी. प्रशासनावर अंकुश राहिलेला नसून ही नामुष्कीची वेळ आलेली आहे, असा आरोप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केला.
देवरूख आगारातील बसफेऱया वेळेवर सुटत नाही, कर्मचारी पगार वेळेवर होत नाही, स्वच्छतेच्या तक्रारी असतात, वाहतुकीचे नियोजन नाही, या सर्वांचा परिणाम म्हणून नागरिकांना नाहक त्रास होत असून, आगारप्रमुख सर्वस्वी जबाबदार आहे. येत्या काळात सर्व तक्रारींचे निरसन न झाल्यास भाजपा तीव्र आंदोलन करेल, असाही इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, नगराध्यक्षा सौ.मृणाल शेटय़े, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, उपाध्यक्ष अभिजीत शेटय़े, युवा नेते भगवतसिंह चुंडावत, माजी आगारप्रमुख सुरेंद्र माने, ओ.बी.सी.शहराध्यक्ष यशवंत गोपाळ, युवा शहराध्यक्ष प्रथमेश धामणस्कर, बाबू विंचू, श्याम लिंगायत आदींसह बहुसंख्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.









