साताऱयाजवळ अपघातात पतीचा मृत्यू
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयानजिक एमआयडीसी परिसरातील जानाई, मळाई देवीचे दर्शन घेवून घरी परतत असताना सातारा जवळ डी-मार्ट नजीक टायोटा शोरुमसमोर लिंब, ता. सातारा येथील एका दांपत्यांवर काळाने घाला घातला. या घटनेत महामार्गावर दुचाकी रस्त्याकडेला असणाऱया कट्टयाला धडकून झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाऊसो कृष्णा येळे (वय 35) हे पत्नी सविता भाऊसो येळे (वय 30, दोघेही रा. लिंब, ता. सातारा) यांच्या समवेत मंगळवारी सकाळी सातारा येथील जानाई-मळाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते. डोंगरावर जावून देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या दुचाकीवरून लिंब येथील घरी परत जात होते.
मात्र, राष्ट्रीय महामार्गावर सातारा जवळ असणाऱया डी मार्ट नजीक दुचाकीने एका कट्टयाला धडक दिली. यामुळे दुचाकीवरुन जोराने रस्त्यावर पडून दुचाकी चालवणाऱया भाऊसो येळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सविता येळे या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे रुग्णालय पोलीस चौकीतून सांगण्यात आले.
दरम्यान, येळे यांच्या अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या इतर कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. अपघाताची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, अपघातात एकाला जीव गमवावा लागल्याने लिंब गावात हळहळ व्यक्त होत आहे.








