श्रीकृष्णाने त्या अस्वलाच्या बिळात शिरून आपण स्यमंतकमणी मिळविणारच, त्याशिवाय द्वारकेत परतणार नाही असा आग्रह धरला. तेव्हा त्याच्याबरोबर आलेले द्वारकावासी यादव त्याची समजूत घालू लागले. ते म्हणाले-हे श्रीकृष्णा! या भयंकर विवरात शिरून आपला जीव धोक्मयात घालावा असे म्हणतोस, हे एवढे अविचारी धाडस कशासाठी? काहीजण म्हणू लागले-सत्राजिताला प्रसेनाचे दागिने, रक्ताने माखलेले फाटलेले कपडे, शस्त्रे देऊन प्रसेनाच्या मृत्यूची वार्ता द्यावी. मग त्याच्या आरोपाचे आपोआप निराकरण होणार नाही काय? त्यावर श्रीकृष्ण म्हणाला-जोवर स्यमंतकमणी शोधून मी परत आणत नाही तोवर माझ्यावर लावलेला कलंक नष्ट होणार नाही. यासाठी मी आता या अस्वलाच्या विवरात प्रवेश करत आहे. सर्वांनी बाहेरच थांबावे. असे म्हणून श्रीहरी त्या गुहेत शिरला. ऋक्षराजाचें भयंकर बिळ । अंधकारें दाटलें बहळ । माजी प्रवेशला घननीळ । साक्षी केवळ प्राज्ञात्वें । असतां मणीचा प्रकाश बिळीं । तरी अंधकार कां तिये स्थळीं । म्हणाल तरी ते गर्ता सरळी । द्वारपर्यंत नसे कें। विवरिं प्रवेशोनि घननीळ। स्वप्रकाशें धवळी बिळ। ठाकिलें ऋक्षराजाचें स्थळ। पुढें प्राञ्जळ अवधारा। ऋक्षराज जांबवंताच्या त्या भयंकर बिळात घनघोर अंधकार होता. त्यामध्ये घननीळ कृष्णाने प्रवेश केला. प्रकाशमान स्यमंतकमणी त्या गुहेत असताना तेथे अंधकार कसा होता? हे विवर मोठे विचित्र वाकडे तिकडे होते. याची आतील द्वारे कोठे आहेत हेच कळत नव्हते. त्यामुळे आतील प्रकाश बाहेर येत नव्हता. अशा काळोख्या बिळात घननीळ श्रीकृष्णाने प्रवेश केला तेव्हा त्याचा स्वयंप्रकाश सर्वत्र पसरला. वक्र कुटिळ अतिलंबाळ। मार्ग क्रमूनि ठाकिलें बिळ । तेथ मणिप्रभाबंबाळ । देखे केवळ बिळगर्भ । सुषुपतिगर्भीं जैसें स्वप्न । तैसें ठाकिलें ऋक्षसदन। तेथ स्यमंतक देदीप्यमान । देखिला दुरून मणिश्रे÷। तपश्चर्येअंतीं फळ। तेंवि श्रमतां श्रीघननीळ। मणि देखोनि सुतेजाळ। तोषे केवळ हृदयकमळीं। बालकाचिया पाळण्यावरी। मणि बांधिला खेळण्यापरी। निकट उभी असे धात्री। तेथ श्रीहरि पातला। तेथ मणिहाणाची धरूनि मति। उभा अर्भकानिकटवर्ती। धात्री देखोनियां श्रीपति । पडली आवर्ती भयार्णवीं। धात्री म्हणिजे ते उपमाता। तिणें देखोनि श्रीकृष्णनाथा। महाभयाई ऊर्मी चित्ता। करित आकान्ता तें ऐका । त्या वाकडय़ा तिकडय़ा गुहेच्या गर्भगृहातच फक्त स्यमंतकमण्याचा प्रकाश पसरला होता. इतर सर्वत्र काळोखच होता. श्रीकृष्ण त्या लांबलचक बिळात आतवर शिरला. तेव्हा, सुशुप्तीमध्ये गाढ झोपेच्या उदरात एखादे स्वप्न पडावे तसा त्या गुहेच्या गर्भगृहातील प्रकाशमान स्यमंतकमणी श्रीकृष्णाने दूरूनच पाहिला. तपश्चर्येनंतर फळ लाभावे तसे खूप श्रम झाल्यानंतर हा स्यमंतकमणी दिसल्यावर श्रीकृष्णाच्या मनात अत्यंत आनंद झाला.बालकाच्या पाळण्यावर एखाद्या खेळण्याप्रमाणे स्यमंतकमणी बांधला होता व त्या पाळण्या शेजारीच बालकाची दाई उभी होती. आता हा स्यमंतकमणी काढून घ्यावा या उद्देशाने श्रीकृष्ण त्या पाळण्याकडे गेला. त्याला अचानक पाहताच त्या बालकाच्या दाईने एकच आकांत केला.
Ad. देवदत्त परुळेकर








