शहरात जास्तीत जास्त लसीकरणावर भर; दोन फिरती केंद्र
प्रतिनिधी/ कराड
जिल्हय़ात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा मुक्काम सहा महिने राहिला असला तरी सप्टेंबर महिन्यात कोरोनाची रोजची रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. अनेक गावे कोरोनामुक्त होऊ लागली असून हॉटस्पॉट असणारे कराड शहरही मंगळवारी कोरोनामुक्त झाल्याची गुड न्यूज आहे. शहरात 1 ऍक्टीव्ह रूग्ण होता. त्यास डिस्चार्ज देण्यात आल्याने शहर कोरोनामुक्त झाले आहे. पहिल्या लाटेत 22 मे 2020 रोजी शहर जिल्हय़ात सर्वप्रथम कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर दुसरी लाट ओसरतानाही कोरोनामुक्त झाले आहे.
कराड शहरात नगरपालिका आणि नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेले दीड वर्ष उपाययोजना करण्यात येत आहे. पहिल्या लाटेत तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कार्यकाळात 22 मे 2020 रोजी शहर कोरोनामुक्त झाले होते. त्यावेळी रूग्णसंख्या कमी होती. मात्र या लाटेचा पीक ऑगस्ट-सप्टेंबर 2020 मध्ये आला होता. त्यावेळी जिल्हय़ात प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट कराड शहर व तालुका झाला होता. त्यावेळी नगरपालिकेने अथक परिश्रम घेऊन संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले होते.
मार्च 2021 पासून दुसरी लाट सातारा जिल्हय़ात सुरू झाली. मात्र दुसऱया लाटेत सातारा हा प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट झाला. जिल्हय़ाची सर्वाधिक रूग्णसंख्या व मृत्यूसंख्या साताऱयात नोंद झाली होती. आता लाट ओसरत असताना साताऱयात रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. दरम्यानच्या काळात कराड तालुक्यातही रूग्णवाढ झाली होती. मात्र महिनाभरात ती आटोक्यात आली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात कराड शहर व तालुक्यात नवे रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. गेल्या आठवडय़ात शहरात केवळ एकच रूग्ण ऍक्टिव्ह होता. या रूग्णास मंगळवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे कराड शहर कोरोनामुक्त झाले आहे. नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राने याकामी घेतलेल्या परिश्रमांना यश मिळाले आहे. कराड शहरात आजअखेर एकूण 7 हजार 379 कोरोनाचे रूग्ण आहेत. सद्या एकही रूग्ण ऍक्टिव्ह नाही. तर आजअखेर 141 जणांना मृत्यू झाला आहे.
आता लसीकरणावर भर; शहरात दोन फिरती केंद्र
संभाव्य तिसऱया लाटेपूर्वी शहरात जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्र प्रयत्न करत असल्याची माहिती नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांनी दिली. बुधवारी नागरी आरोग्य केंद्रात 243 व शाळा क्रमांक नऊमध्ये 116 जणांना लसीकरण करण्यात आले. पालिकेला फिरती लसीकरण केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रासह शहरात दोन लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. सद्यस्थितीत नागरी केंद्रासह शाळा क्रमांक नऊमध्ये लसीकरण सुरू आहे. याशिवाय यानंतर शहरात विविध भागात केंद्र उघडण्यात येणार असून यासाठी नगरसेवकांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शीतल कुलकर्णी यांनी दिली.








