दुबई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्सचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहरला शुक्रवारपासून सरावाची परवानगी देण्यात आली. कोव्हिड-19 मधून सावरल्यानंतर बीसीसीआयने त्याला ही परवानगी दिली. मागील दोन चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चहर संघाच्या जैवसुरक्षित वातावरणात दाखल झाला. बीसीसीआयच्या शिष्टाचाराप्रमाणे दोन अहवाल निगेटिव्ह येईतोवर त्याला सरावाची परवानगी मिळणार नव्हती.
‘चहर आजपासूनच सरावाला सुरुवात करेल. त्याला यासाठी बीसीसीआयने हिरवा कंदील दर्शवला आहे. संघाची तयारी उत्तम रितीने सुरु आहे आणि आमचा संघ पहिल्या सामन्यासाठी पूर्ण सज्ज आहे’, असे चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले. गतवर्षी उपविजेता असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची सलामी लढत गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध दि. 19 रोजी होणार आहे. दरम्यान, चहरबरोबरच आणखी एक पॉझिटिव्ह ठरलेल्या ऋतुराज गायकवाडची शनिवारी पुढील चाचणी होणार आहे.
मॉर्गन, कमिन्स पहिल्या लढतीसाठी उपलब्ध
नवी दिल्ली : इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गन व ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्स हे कोलकाता नाईट रायडर्सतर्फे पहिल्या लढतीसाठी उपलब्ध असतील, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. केकेआर व्यवस्थापनाने स्थानिक प्रशासनाला या उभयतांचा क्वारन्टाईन कालावधी 14 ऐवजी 6 दिवसांचा असेल, यासाठी विनंती केली होती. ती मान्य झाल्याने या उभयतांना केकेआरच्या पहिल्या लढतीत खेळता येईल. केकेआरची पहिली लढत दि. 23 सप्टेंबर रोजी होणार आहे.









