पोलीस आयुक्तांना म. ए. युवा समितीचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
देसूर-राजहंसगड रस्त्यावरील दिशादर्शक फलकाची मोडतोड करण्यात आली. 26 जूनच्या रात्री समाजकंटकांनी नासधूस केली आहे. मराठी भाषेत हा फलक असल्याने कन्नड संघटनांनी पाडला आहे. याबाबत फेसबुक पेजवर याचा उल्लेखही करण्यात आला होता. तेव्हा अशाप्रकारे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली.
देसूर, राजहंसगड, सुळगा-येळ्ळूर, नंदिहळ्ळी यासह इतर परिसरात मराठी भाषिक राहतात. राजहंसगडाला तसेच इतर गावांना मराठी भाषिकच ये-जा करतात. असे असताना मराठी विरुद्ध कन्नड असे करून काही समाजकंटक चिथावणी देत आहेत. तेव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फेसबुक पेजवर ज्या पोस्ट कमेंट करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये मराठी भाषिकांना तुच्छ लेखण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला आहे. तेव्हा या समाजकंटकांवर आणि त्या फेसबुक पेजवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









