ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे उद्गार : भारतीयांकडून प्रशासनाला सहकार्य
वृत्तसंस्था/ लंडन
दिवाळीचा संदेश अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचा आणि दुष्ट प्रवृत्तींवरील सद्गुणांच्या विजयाचा आहे. हा सण कोरोना महामारीवर आम्ही विजय मिळवू असा आशादायी संदेशही देतो, असे उद्गार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काढले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशवासीयांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. दुसऱया टप्प्यातील संक्रमण पाहता इंग्लंडमध्ये दोन डिसेंबरपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
निश्चितपणे भविष्यात मोठी आव्हाने आहेत. परंतु सरकारला लोकांची संकल्प शक्ती, त्यांची लढण्याची क्षमता आणि या आजाराला आम्ही मात करू यावर पूर्ण विश्वास असल्याचे जॉन्सन यांनी लंडन येथील 10 डाउनिंग स्ट्रीट या स्वतःच्या निवासस्थानावरून प्रसारित संदेशात नमूद केले आहे.
अंधकारावर प्रकाशाचा विजय होतो आणि असत्यावर सत्याचा विजय होतो, अशी शिकण दिपावली देते. ज्याप्रकारे भगवान राम हे असूर रावणाला पराभूत करून परतले होते, तेव्हा लाखो दिव्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले होते, त्याचप्रकारे या दिवाळीत आम्ही कोरोनादरम्यान आमचा मार्ग तयार करू आणि या आजाराविरोधात विजय मिळवू असे जॉन्सन म्हणाले.
अवघड काळात भारतीय वंशाच्या लोकांनी सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी मोठा त्याग केला आहे. या आजाराशी लढण्यास प्रशासनाला सहकार्य केले आहे. अंतराचे पालन करून सण साजरा करणे सोपे नसल्याचे मला ज्ञात आहे. तुम्ही सर्वजण एकत्र येऊ पाहत असताना, मित्रांसोबत मौजमजा करण्याची इच्छा असताना आणि त्यांच्यासोबत समोसा आणि गुलाबजाम खाण्याची इच्छा असताना हे अधिकच अवघड ठरते. परंतु भारतीयांचा त्याग आणि संकल्प कौतुकास्पद असून त्यांचे प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे जॉन्सन यांनी भारतीय वंशीय लोकांना उद्देशून म्हटले आहे.









