- उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा!
ऑनलाईन टीम / मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटले की , दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. दिवाळीनिमित्त घराघरात लागलेल्या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-प्रथा-परंपरांचा अंधारही आपल्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करुया.
पुढे ते म्हणाले, आपले राज्य सध्या कोरोना संकटाशी लढत आहे. ही लढाई लवकर जिंकायची असेल तर सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे. मास्क लावणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुत रहाणे, यासारखी दक्षता घेऊन प्रत्येकाने स्वत:ला, कुटुंबाला व समाजाला सुरक्षित ठेवण्यात योगदान द्यावे. तसेच दिवाळी सणाच्या काळात कोरोना आणि प्रदूषण वाढणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही पवारांनी यावेळी केले आहे.