37,291 जणांना डिस्चार्ज ः 593 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशभरात शुक्रवारीही 41 हजार 649 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय कमी होत असल्याचे दिसून येत असतानाच पुन्हा रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी दिवसभरात 37 हजार 291 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात शुक्रवारी 593 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशभरात 4 लाख 23 हजार 810 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 4 लाख 08 हजार 920 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 13 हजार 993 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 3 कोटी 07 लाख 81 हजार 263 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. भारतात 46 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने विक्रम नोंदविला आहे.
देशात गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याचे दिलासादायक चित्र देखील पाहायला मिळाले. त्यातच कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे.









