प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या तिसऱया लाटेमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरटीपीसीआर तपासणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आल्यामुळे विमानाच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. मागील 20 दिवसांमध्ये तब्बल चारवेळा दिल्ली-बेळगाव-दिल्ली विमानफेरी रद्द करण्यात आली आहे. अचानक विमानफेरी रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
13 ऑगस्ट 2021 पासून बेळगाव-दिल्ली या दोन शहरांमध्ये विमानफेरी सुरू करण्यात आली. अवघ्या अडीच तासांमध्ये देशाच्या राजधानीला पोहोचता येत असल्यामुळे प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला. केवळ दोन दिवस असणारी ही विमानफेरी डिसेंबरपासून आठवडय़ातून चार दिवस करण्यात आली आहे. प्रवासी संख्येत वाढ झाल्याने 189 आसन क्षमता असणारे बोईंग विमान बेळगावमध्ये येत होते.
डिसेंबरअखेरपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे. जानेवारी महिन्यापासून बेळगाव-दिल्ली या विमानफेरीसाठी प्रवासी संख्या कमी होत गेली. प्रवासी कमी असतील तर विमानफेरीचा खर्च परवडणारा नसल्याने त्यादिवशी विमान रद्द केले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जानेवारी महिन्यात दि. 11, 13, 15, व 17 रोजी असे चार दिवस विमानफेरी रद्द करण्यात आली. काही प्रवाशांनी यापूर्वीच बुकिंग केले असल्यामुळे विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना फटका बसला. त्या प्रवाशांना इतर शहरांमधून कनेक्टींग फ्लाईटने प्रवास करावा लागत आहे.









