वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित संघटनेचा विजय झाला आहे. या संघटनेने अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी तीन पदे जिंकली असून काँग्रेसप्रणित एनएसयुआय या संघटनेने उपाध्यक्षपद जिंकले आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक प्रथमच दिल्ली विधानसभेत सत्ताधारी असणारा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी युती करुन लढविली होती. तरीही अभाविपने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला आहे.
अध्यक्षपदी अभाविपचे तुषार देधा हे 10 हजार मतांपेक्षा अधिक मतांच्या आधिक्क्याने विजयी झाले असून या संघटनेच्या उमेदवार अपराजिता यांनी सचिवपदाची निवडणूक मोठ्या मतांच्या अंतराने जिंकली. तसेच सहसचिवपदी याच संघटनेचे सचिन बैसला विजयी झाले आहेत. उपाध्यक्षपद एनएसयुआयने मिळविले असून अभी दहिया 300 पेक्षा काही अधिक मतांच्या निसटत्या आधिक्क्याने विजयी झाले आहेत. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या विद्यार्थी संघटनांनी युती केल्याने या निवडणुकीला मोठेच महत्व प्राप्त झाले होते.
भाजप नेत्यांकडून अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्रंाr अमित शहा आणि केंद्रीय मंत्री दर्शना जरदोष या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अभाविपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. भारतातला युवावर्ग राष्ट्रवादाच्या समर्थनात आहे, हे या निवडणुकीच्या परिणामांवरुन सिद्ध झाले आहे, असे अमित शहा यांनी त्यांच्या संदेशात स्पष्ट केले आहे. जरदोष यांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.