नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएल प्रँचायजी दिल्ली कॅपिटल्स संघातील अनुभवामुळे माझ्या खेळात प्रगल्भता आली. या हंगामात आणखी सरस योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे इंग्लिश यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्ज शुक्रवारी म्हणाला. सॅम बिलिंग्ज यापूर्वी 2016 व 2017 मध्ये दिल्ली प्रँचायजीमध्ये समाविष्ट होता. यंदा फेब्रुवारीत संपन्न झालेल्या लिलावात दिल्लीने त्याला पुन्हा एकदा करारबद्ध केले. दिल्लीने त्याच्या 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर करार केला.
29 वर्षीय सॅम बिलिंग्जने आतापर्यंत खेळलेल्या 187 टी-20 सामन्यात 3527 धावा केल्या आहेत, 107 झेल घेतले आहेत तर 17 फलंदाजांना यष्टीचीतही केले आहे. यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची धुरा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतकडे असून नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. दिल्लीची यंदाची आयपीएल मोहीम दि. 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढतीने सुरु होईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.









