सावधगिरी बाळगण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या दरम्यान आता विविध राज्यात बर्ड फ्लूचे संक्रमण पसरत चालले आहे. त्यामुळे बर्ड फ्लूपासून सुटका मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आता दिल्लीतही बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले असून केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात येथेही सतर्कता बाळगली जात आहे. याच कारणास्तव जम्मू काश्मीर, मध्यप्रदेशसह काही राज्यात पोल्ट्री व्यवसायावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यापूर्वी 2006 मध्ये देशात एवियन इंफ्लुएंजाची प्रकरणे समोर आली होती.
देशातील काही राज्यात पोल्ट्री, कावळे आणि स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे. राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश आणि केरळात बर्ड फ्लूची पुष्टी झाली असल्याचे केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी स्पष्ट केले आहे. वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने दिल्लीत कंट्रोल रुम तयार केले आहेत. केरळ, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील परिस्थिती पाहता केंद्राने राज्यांसमवेत बैठक घेत परिस्थितीसंदर्भात आढावा घेतला. बर्ड फ्लू संक्रमणामुळे होणाऱया नुकसानीमुळे राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या 10 दिवसांमध्ये मृत पक्षांचा आकडा 15 लाखांच्या जवळ पोहोचला आहे. फक्त हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूने 3 हजार स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. अन्य काही राज्यांमध्ये विविध प्रकारचे पक्षी मृत्युमुखी पडत असून, यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालये, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प प्रमुखांनी आपल्याकडील वन्यजीवांची काळजी घ्यावी, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने दिली आहे.