बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 48.36 टक्क्यांवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती,
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील रुग्णसंख्येत सोमवारी एकाच दिवसात 9983 रुग्णांची भर पडली आहे. तथापि बरे होण्याचे प्रमाण 48.36 टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दरम्यान, दिल्लीत मात्र एकाच दिवसात 1282 रुग्ण आढळले असून गेल्या 14 दिवसांचा आढावा घेतला असता दिल्लीला सामुहिक संसर्गाचा धोका वाढत असल्याची भीती आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली.
दिल्लीत गेल्या 24 तासांत 1282 रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 28936 झाली आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता येत्या दोन आठवडय़ात ही संख्या 58 हजारावर जाण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये विमानसेवा बंद ठेवली जावी, अशी मागणी सत्येंद्र जैन यांनी केली आहे. दिल्लीत सध्या 17125 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 8500 ते 9000 बेड उपब्लध असून अजून तेवढेच बेड येत्या काही दिवसात उपलब्ध केले जातील, असे त्यांनी सांगितले.
तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडले असून त्यांना ताप व घश्याला त्रास जाणवत आहे. त्यांचीही कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. सध्या त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीवासियांनाच प्राधान्य दिले जाणार आहे, असेही सांगण्यात आले.
देशात गेल्या 24 तासांमाध्ये 9983 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7135 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सध्या एकुण रुग्णसंख्या 256611 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. 125381 रुग्णांवर उपचार सुरु असून 124094 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचेही या अधिकाऱयाने स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 48.36 टक्के आहे. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात सर्वाधिक 91 जणांचा मृत्यु झाला आहे. तर एकूण मृतांपैकी 70 टक्के रुग्ण अन्य आजारांनी त्रस्त होते, असेही त्यांनी सांगितले.









