घरोघरी सर्वेक्षणातून खुलासा : संसर्गानंतर आपोआप बरे झाले लोक : रक्तनमुन्यांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजधानीच्या 20,000 घरांमध्ये झालेल्या सीरो-सर्व्हिलान्स सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणानुसार नमुन्यांपैकी सुमारे 10-15 टक्के कोरोना विषाणूने बाधित असू शकतात. म्हणजेच दिल्लीच्या सुमारे 15 टक्के लोकसंख्येला कोविड-19 चा संसर्ग होऊन गेला आहे. हे सर्वेक्षण 27 जून ते 5 जुलैदरम्यान दिल्लीच्या सर्व जिल्हय़ांमध्ये करण्यात आले होते.
लोकसंख्येच्या किती हिस्स्यात कोरोना फैलावला आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. अँटीबॉडी चाचणीसाठी एकूण 22,823 नमुने प्राप्त करण्यात आले होते. सर्वेक्षणात 10-15 टक्के लोकांना संसर्ग झाला होता आणि ते यातून बरेही झाले आहेत. काही ठिकाणी हे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा अधिक राहिले आहे.
स्थानिक पातळीवर फैलाव
कोरोनाचा फैलाव विविध जिल्हय़ांमध्ये वेगवेगळा आहे. यापूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही (आयसीएमआर) दिल्लीच्या कंटेन्मेंट झोनमध्ये सीरो सर्वेक्षण केले होते, परंतु त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु त्या सर्वेक्षणानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये 10-30 टक्के फैलावाचा थांगपत्ता लागला आहे.
सीरो सर्वेक्षण
रक्तनमुन्यांच्या अँटीबॉडी चाचणीद्वारे शरीरात अँटीबॉडीजचा शोध लागतो. या अँटीबॉडीद्वारे संबंधित व्यक्तीला विषाणूची बाधा झाली होती की नाही हे समजून येते. संसर्गाच्या विरोधात लढणाऱया अँटीबॉडीज प्रत्यक्षात प्रोटीन्स असतात.
कित्येक महिने शरीरात अस्तित्व
दिल्लीच्या 20 हजार घरांमधून नमुने प्राप्त करत आयजीजी अँटीबॉडीजचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अँटीबॉडीज सार्स-कोव्ह-2 च्या विरोधात लढतात. संसर्गाच्या 14 दिवसांनी अँटीबॉडीज शरीरात मिळू लागतात आणि कित्येक महिन्यांमध्ये रक्तांमध्ये त्यांचे अस्तित्व राहते.
कोविड कवच किट्स
सीरो सर्वेक्षणासाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजीने तयार केलेल्या कोविड कवच एलिसा किट्सचा वापर करण्यात आला आहे. कोविड-19 च्या क्लीनिकल निदानासाठी रियल टाईम आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. चाचणीसाठी अँटीजन टेस्ट किटचाही वापर आता होत आहे.
दिल्लीत कोरोना संसर्ग घटण्याच्या मार्गावर
दिल्लीत रविवारी संसर्गाचा दर कमी होत स्वतःच्या नीचांकी 7.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रविवारी दिल्लीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.97 टक्क्यांवर पोहोचले आहे, म्हणजेच प्रत्येक 5 पैकी 4 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. रुग्णालयांमध्ये आता केवळ 4,315 रुग्ण उपचार घेत आहेत.









