दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रासाठीही यंदाचा आयपीएल हंगाम आता संपुष्टात आला आहे. शारजा येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या लढतीत बोटाला दुखापत झाल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.
37 वर्षीय मिश्राला केकेआरचा फलंदाज नितीश राणाचा अवघड झेल टिपताना बोटाला दुखापत झाली. दि. 3 ऑक्टोबर रोजी हा सामना झाला होता. त्या दुखापतीनंतरही त्याने जिद्दीने आणखी दोन षटके टाकत धोकादायक शुभमन गिलचा बळी घेतला. पण, यादरम्यान त्याला वेदना जाणवत असल्याचे सातत्याने दिसून येत राहिले. दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाने मिश्रा स्पर्धेतून बाहेर पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्याची उणीव संघाला प्रकर्षाने जाणवेल, असे नमूद केले आहे.
‘अमित मिश्रा इथून मायदेशी परतेल आणि तेथे तो वैद्यकीय पथकाशी संपर्क साधेल. तो या दुखापतीतून लवकर सावरावा, यासाठी आमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत’, असे दिल्ली व्यवस्थापनाने पत्रकातून म्हटले आहे. अमित मिश्राने या हंगामात 3 सामने खेळले आणि त्यात 3 बळी घेतले. त्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 25 धावात 2 तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 14 धावात 1 बळी घेतला. याशिवाय, चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध बळी मिळवता आला नसला तरी त्याने 4 षटकात फक्त 23 धावा दिल्या.
अमित मिश्रा आयपीएल इतिहासात दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून त्याच्या खात्यावर 160 बळी आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये लंकेचा स्पीडस्टार लसिथ मलिंगा 170 बळींसह अव्वलस्थानी आहे. मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे.









