प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए लीग वरिष्ठ गट फुटबॉल स्पध्sा&त रविवारचा दिवस बरोबरीचा राहिला. दिलबहार विरुध्द जुना बुधवार यांच्यातील सामना ‘गोलशून्य’ तर संध्यामठ विरुध्द बीजीएम स्पोर्टस यांच्यातील सामना 1-1 गोल बरोबरीत राहिला. सोमवारी सामन्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मंगळवारी पुन्हा सामन्यांना सुरूवात होणार असून दुपारी 4 वाजता शिवाजी विरुध्द जुना बुधवार यांच्यात सामना होणार आहे.
दुपारी चार वाजता झालेल्या सामन्यात दोन्हीही संघातील खेळाडूंनी समांतर खेळाचे प्रदर्शन घडविले. दिलबहारकडून शुभम माळी, जावेद जमादार, राहुल तळेकर, सनी सनगर, सचिन पाटील, रोहन दाभोळकर तर जुना बुधवारकडून शिबु सनी, अकिल पाटील, सुशिल सावंत, रोहन कांबळे, अमित सावंत यांनी वेगवान खेळ करून प्रतिस्पर्धी संघांवर गोल करण्याचे केलेले अनेक प्रयत्न फोल ठरले. अनेक सोप्या संधींवरही गोल करता आला नसल्याने पूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
दुपारी दोन वाजता झालेल्या सामन्यात संध्यामठकडून अभिजीत सुतार, आशिष पाटील, स्वराज्य सरनाईक, ओंकार पाटील यांनी तर बीजीएमकडून ओंकार खोत, विशाल पाटील, संदेश साळोखे, अमित पोवार, नितीन रेडेकर यांनी चांगला खेळ केला. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला बीजीएमचा खेळाडू अभिजीत साळोखेने मैदानी गोल करून संघाला पूर्वार्धात 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कमी करण्यासाठी संध्यामठने वेगवान खेळाचे धोरण अवलंबले. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला अभिजीत सुतारने मैदानी गोल करून संघाला 1-1 गोल बरोबरी मिळवून दिली. सामना पूर्णवेळ 1-1 गोल बरोबरीत राहिला. रविवारी झालेले दोन्हीही सामने बरोबरीचे राहिल्याने चारही संघांना प्रत्येकी 1 गुण बहाल करण्यात आले