प्रतिनिधी/ दापोली
तालुक्यात विविधठिकाणी कामासाठी असणाऱया परराज्यातील महिलांनी त्यांना त्यांच्या राज्यात जाऊ द्यावे याकरिता नगरपंचायतीवर सोमवारी सकाळी धडक मोर्चा काढला. मात्र त्यांना योग्यठिकाणी दाद मागा असे सांगून परत पाठवण्यात आले.
तालुक्यात अनेकठिकाणी परराज्यातून आलेल्या मजूर महिला काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने हे सर्व मजूर इथे लॉकडाऊन झाले आहेत. शिवाय हाताला काम नसल्याने हे सर्व मजूर आपल्या कुटुंबासह बसून आहेत. 4 मे रोजी लॉकडाऊन शिथिल होणार आहे याची माहिती या सर्वांना मिळाल्यामुळे आपल्याला आपल्या गावी सहज जाता येईल असा समज करून घेतला. मात्र शहरात आल्यावर त्यांना दापोलीतून बाहेर जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे संतप्त झालेल्या या महिलांनी थेट दापोली नगरपंचायतीवर मोर्चा नेला. मात्र तेथे गेल्यावर त्यांना नगरपंचायत अधिकाऱयांनी त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याबाबत नगरपंचायत काहीच करू शकत नसल्याचे व त्यांना तसे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय आपण योग्यठिकाणी जाऊन दाद मागा, असे सांगितले.
यानंतर या महिला आल्यापावली निघून गेल्या. मात्र या मोर्चानंतर तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजकारणाचा वास?
नगरपंचायत परजिह्यात जाणाऱया नागरिकांसाठी काही करू शकत नाही हे सर्वांना ज्ञात आहे. तरीदेखील या महिलांना कोणीतरी चुकीची माहिती देऊन नगरपंचायतीवर मोर्चा नेण्यास सांगितले. यामुळे या महिलांना नगरपंचायतीवर मोर्चा घेऊन जायला सांगण्यात कुणाचे राजकारण आहे का, याची दिवसभर चर्चा दापोलीत सुरू होती.









