प्रतिनिधी/ दापोली :
कोरोना पॉझीटीव्ह अहवाल येण्यापुर्वी क्वारंटाईन असतानाही दापोली शहर व काळकाईकोंड परिसरात बिनदिक्कत फिरणाऱया कोरानाग्रस्त युवकावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबधीत दोषी कर्मचाऱयावर गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्यातील शिर्दे मुळगाव असणारा हा युवक 27 जणांबरोबर मुंबईतून 28 मे रोजी चालत आला होता. यानंतर त्याला क्वारन्टाईन करून शहरातील ए. जी. हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. 5 मे रोजी तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल आला. मात्र, आदल्याच दिवशी आरोग्य कर्मचाऱयांने होम क्वारन्टाईनचा शिक्का मारून त्याला घरी पाठवले होते. यानंतर हा युवक दापोली शहर व काळकाई कोंड परिसरात फिरला, मित्रांसह अनेकांच्या तो संपर्कात आला.
त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला शोधून पुन्हा विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी पवार यांनी संबधीत कर्मचाऱयावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. मात्र प्रशासनाने केवळ कोरोनाग्रस्तावर गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अधिकाऱयांच्या सूचनेनुसारच आपण असा शिक्का मारल्याचा दावा या आरोग्य कर्मचाऱयाने केला आहे. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापक्ररणी आरोग्य पर्यवेक्षक सुभाष भिल्या पाडवी यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी गुजर करीत आहेत.









