ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात
प्रतिनिधी / दापोली
शहरातील कामगार गल्लीतील दोन कापड दुकानांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र यामुळे दापोली नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
दापोली शहरातील सानेगुरुजी उद्यानासमोर कामगार गल्लीत अनेक स्वयंरोजगाराची दुकाने आहेत. येथील जयवंत गोरीवले व संगीता नार्वेकर यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला. ही दुकाने पत्र्याची बांधली आहेत. यामुळे या दुकानांवरुन गेलेल्या वीज प्रवाहित तारांवर माकडांनी उडी मारल्यामुळे या दुकानांनी अचानक पेट घेतला.
दोन्ही दुकानदारांचे आगीत मोठे नुकसान
तत्काळ दुकानदार व व्यापाऱयांनी धावाधाव करून पाण्याचा मारा करून दोन्ही दुकानांची आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. मात्र गोरीवले व नार्वेकर या दोन्ही दुकानदारांचे आगीत मोठे नुकसान झाले. ही आग लागल्यानंतर अनेकांनी दापोली नगर पंचायतमध्ये अग्निशमन बंबासाठी फोन केला. मात्र दापोली नगर पंचायतीचा अग्निशमन बंब गेली कित्येक महिने नादुरुस्त असल्याने अग्निशमन बंबाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे









