कोल्हापूर विभागाचा दहावीचा 29.72 टक्के तर बारावी जुन्या अभ्यासक्रमाचा 29.28 टक्के, नवीन अभ्यासक्रमाचा 22.36 टक्के निकाल
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागाचा दहावीचा 29.72 तर बारावी जुन्या अभ्यासक्रमाचा 29.28 टक्के तर बारावी नवीन अभ्यासक्रमाचा 22.36 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पाहिला. निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग रिकामा झाला आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
राज्याचा दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल 29.14 टक्के तर राज्याचा बारावी जुन्या अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षेचा 27.31 टक्के तर नवीन अभ्यासक्रमाचा 25.87 टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागातून दहावीला 830 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 740 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 220 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हÎांचा निकाल 29.72 टक्के लागला आहे. तर बारावी जुन्या अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षेला 919 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता.
त्यापैकी 915 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 268 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमाचा कोल्हापूर विभागाचा निकाल 29.28 टक्के लागला आहे. तसेच बारावी नवीन अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षेला 83 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 76 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमाचा 22.36 टक्के निकाल लागला झाला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी 21 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत विहीत नमुन्यात शुल्कासह गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.
उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसाच्या आत 300 रूपये शुल्कासह पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावयाचा आहे. निकालासंदर्भात आलेल्या अडचणी, शंका निरसण करण्यासाठी पुढील पाच दिवस समुपदेशन केले जाणार आहे. श्रेणीसुधारसाठी दोन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुरवणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील सविस्तर माहिती संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.