प्रतिनिधी / पणजी :
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. त्याचे परिपत्रक राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना पाठविले आहे. परीक्षेच्यावेळी कोणती मार्गदर्शक तत्वे पाळावीत याचाही उल्लेख त्यात करण्यात आला असून त्याची काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे बजावण्यात आले आहे. मंडळाचे सचिव भागिरथ शेटये यांनी ते वेळापत्रक जारी केले आहे.
वेळापत्रकानुसार गुरुवार 21 व शुक्रवार 22 मे असे दोन दिवस सकाळी 9 ते 11 या वेळेत दहावीचे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पेपर्स होणार आहेत. दहावीच्या प्रमुख विषयांच्या पेपर्सची परीक्षा शनिवार 23 मे या दिवसापासून सुरू होणार आहे. त्या दिवशी प्रथम भाषेचा पेपर आहे. सकाळी 9 ते 11.30 अशी त्याची वेळ आहे. त्यानंतर मंगळवार 26 मे रोजी मॅथेमॅटिक्स (गणित) हा पेपर होईल. बुधवार 27 मे रोजी दुसऱया भाषेचा पेपर आहे.
गुरुवार 28 मे रोजी तिसऱया भाषेचा पेपर निश्चित करण्यात आलेला आहे. शुक्रवारी 29 मे रोजी सोशल सायन्स एक / हिस्ट्री – पॉलिटिकल सायन्स या विषयाचा पेपर होईल. शनिवारी 30 मे रोजी सोशल सायन्स दोन / जॉग्रॉफी – इकॉनॉमिक्स हा पेपर घेण्यात येईल. सोमवारी 1 जून रोजी सायन्स / जनरल सायन्स हा पेपर होईल, अशी माहिती वेळापत्रकातून देण्यात आली आहे.
मंगळवार 2 जून रोजी ड्रॉईंग – पेंटिंग, बुधवार 3 जून रोजी वर्ड प्रोसेसिंग, गुरुवार 4 जून रोजी बेसिक फ्लोर्राकल्चर तर शुक्रवार 5 जून रोजी बेकरी फंडामेंटल व शनिवार 6 जून रोजी डेस्क टॉप पब्लिशिंग हे पेपर्स घेण्यात येणार आहे.
बारावी परीक्षेचे पेपर्स 20 ते 22 मे असे तीन दिवस घेण्यात येतील. बुधवार दि. 20 मे रोजी मराठी, गुरुवार 21 मे रोजी पॉलिटिकल सायन्स व शुक्रवार 22 मे रोजी जॉग्रॉफी हे पेपर्स होतील, अशी माहिती वेळापत्रकात आहे. सविस्तर वेळापत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले असून बोर्डाच्या वेबसाईटवरही ते उपलब्ध आहे.
विद्यार्थी, पालक शिक्षकवर्गाला महत्वाच्या सूचना
विद्यार्थ्यांना शाळेत आणताना, परत नेताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क व अन्ये नियमांचे पालन करावे लागणार आहे. पालकांना केंद्रात सोडले जाणार नाही. त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सर्व केंद्रांवर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गरज पडल्यास त्यासाठी पालक-शिक्षक संघाला सामावून घेण्यात येईल. सर्व परीक्षा केंद्रे परीक्षा सुरु होण्यापूर्वी सॅनिटाईझ करण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक व प्राचार्यांनी गरज पडेल तेव्हा सर्व संबंधितांना योग्य सल्ला द्यावा, असे कळविण्यात आले आहे.









