शनिवार 21 पासून प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
दिवाळीनंतर म्हणजे 21 नोव्हेंबरपासून राज्यात दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालू करण्याबाबत काही ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे सर्व नियम, अटी आणि मार्गदर्शक तत्वे पाळून हे वर्ग सुरू होतील, असेही ते म्हणाले.
शिक्षण खात्याने सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर काल मंगळवारी एका बैठकीत त्याचा आढावा घेण्यात आला. त्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा एकमताने निर्णय झाला असून त्याची सुरुवात दिवाळी सुट्टीनंतर म्हणजे 21 नोव्हेंबरपासून केली जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
मार्गदर्शक तत्वे सर्व शाळांना पाठविणार
शिक्षण खाते दहावी बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्वे (एसओपी) तयार करणार असून त्याची माहिती सर्व शाळांना पाठवण्यात येणार आहे. ती एसओपी पाळणे शाळांवर बंधनकारक असेल. इतर इयत्तांचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा सरकारचा इरादा आहे. दहावी बारावीच्या वर्गांना कसा काय प्रतिसाद मिळतो? पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होतात की नाही? हे सर्व पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 9 ते 20 नोव्हेंबर अशी दिवाळीची सुट्टी शिक्षण खात्याने सर्व शाळांसाठी यापूर्वीच जाहीर केली असून ती संपताच दहावी व बारावीचे वर्ग चालू करण्याचे ठरविण्यात आले आहे.
कोरोना संकटामुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष जून 2020 पासून सुरूच होऊ शकले नाही. त्यामुळे जून ते आता नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व विद्यालये बंदच आहेत. ती चालू करण्याची तयारी सरकारने केली आहे. पालक मुलांना शाळेत पाठवतील की नाही? हा देखील एक प्रश्नच आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्याचे सावंत म्हणतात. परंतु या निर्णयावर पालक शिक्षक संघ, शिक्षक मुख्याध्यापक संघटना काय प्रतिक्रिया देतात आणि ठरवतात त्यावरच पुढचे गणित अवलंबून आहे. कोरोनाचे संकट अद्याप कायम असून ते कमी होत असले तरी पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे दहावी बारावीच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची देखील कसोटी लागणार आहे.
आयआयटी प्रकल्प मेळावलीतच साकारणार
सरकार शेळ-मेळावली येथेच आयआयटी प्रकल्प साकारणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. संपूर्ण जागा सरकारच्या मालकीची असून काजू बागायती असलेल्या शेतकऱयांचे इतर ठिकाणी जमिनी देऊन पुनर्वसन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेळ मेळावली येथे भेट दिली होती तेव्हा सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे आश्वासन तेथील ग्रामस्थांना दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे निवेदन आश्चर्यकारक असून तेथील ग्रामस्थांसाठी धक्कादायक ठरणारे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनामुळे आयआयटी प्रकल्पाचा विषय पुन्हा एकदा चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.









