महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचना
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेला दहा मिनिटानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रात सकाळी 10.20 व दुपारच्या सत्रात दुपारी 2.50 नंतर परीक्षा केंद्रात येणाऱया विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नये, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून दिल्या आहेत. तरी सर्व परीक्षा केंद्र, विद्यार्थी यांनी या सूचनांचे पालक करावे, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांनी केले आहे.
दहावीच्या परीक्षेला येताना सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापुर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. अपरिहार्य कारणामुळे परीक्षा सुरू होण्यापुर्वी म्हणजेच सकाळच्या सत्रात 10.30 व दुपारच्या सत्रात 3 वाजता आल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांची तपासणी करून व विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी द्यावी. परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रात 10.30 व दुपारच्या सत्रात 3 वाजल्यानंतर आल्यास कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देवू नये. परीक्षा केंद्रात मोबाईल, व अन्य तत्सम साधने बाळगण्यास व वापरण्यास परवानगी नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. या सर्व सूचनांचे पालन प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर संबंधीत घटकांनी करणे बंधनकारक आहे.