1 ली ते 9 वी व 11 वीची परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतरच, शासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेली इयत्ता 10 वी बोर्डाची परीक्षा 27 एप्रिल रोजी तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिलला सुरु होत आहे. या दोन्ही परीक्षा 21 मे रोजी संपणार आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या परीक्षानंतरच इयत्ता 1 ली ते 9 आणि 11 वीची परीक्षा घेण्याबाबत राज्यशासनाचा कल आहे. पण त्याबाबत शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी लॉकडाऊनच्या काळात अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम सुरळीतपणे पूर्ण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची भूमिका आहे. दरम्यान दहावी, बारावीच्या परीक्षेपूर्वी अथवा नंतर इतर वर्गांच्या परीक्षा घेण्याबाबत होणाऱया शासन आदेशानुसार सर्व प्रक्रिया राबवली जाणार आहे.
आजतागायत इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेबुवारीदरम्यान आणि 10 वी ची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु होऊन महिना अखेरीस पूर्ण होत होत्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात इयत्ता 1 ली ते 9 वी आणि 11 वीच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. पण चालू शैक्षणिक वर्षात कोरोना महामारीमुळे दोन्ही बोर्डाच्या परीक्षा एप्रिलच्या उत्तरार्धात सुरु होऊन 21 मे पर्यंत संपणार आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेनंतरच इतर वर्गाच्या परीक्षा घ्याव्यात की त्यापूर्वी घ्याव्यात याबाबत अद्याप शासनाकडून कोणतेही निर्देश नाहीत. जानेवारीअखेरीस शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यामुळे अद्याप इयत्ता 1 ली ते 9 वी आणि 11 वीच्या वर्गांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेनंतरच या परीक्षा घ्याव्यात, अशी पालकांची मागणी आहे. तर बोर्ड परीक्षेपूर्वीच इतर वर्गांच्या परीक्षा घ्याव्यात अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. त्यामुळे याबाबत शासन कोणती भूमिका घेणार, याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष आहे.
बोर्ड परीक्षेनंतरच इतर वर्गांच्या परीक्षा घेणे आवश्यक
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 8 ते 9 महिने शाळा बंद होत्या. या कालावधीत काही शाळांनी ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम सुरु ठेवला असला तरी विद्यार्थ्यांना त्याचे पूर्णपणे आकलन झालेले नाही. त्यामुळे सर्व अभ्यासक्रम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी इयत्ता 10 वी 12 वीच्या बोर्ड परीक्षेनंतरच 1 ली ते 9 वी आणि 11 वीच्या वर्गाची परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. – किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प.कोल्हापूर









