वृत्तसंस्था/ श्रीनगर
दहशतवादी संघटनांसोबत संबंध बाळगणाऱया शासकीय कर्मचाऱयांबद्दल जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी कठोर भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी बुधवारी पुन्हा एकदा 6 शासकीय कर्मचाऱयांना बडतर्फ केले आहे. या कर्मचाऱयांवर दहशतवादी संघटनांशी संबंध बाळगणे आणि त्यांच्यासाठी ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या स्वरुपात काम करण्याचा आरोप आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱयांमध्ये दोन पोलीस कर्मचारी देखील आहेत.
राज्यपालांकडून नियुक्त एका समितीच्या शिफारसीवर ही कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी जुलै महिन्यात देखील 11 कर्मचाऱयांना नोकरीवरून हटविण्यात आले होते. या कर्मचाऱयांमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सैयद सलाहुद्दीनचा मुलगा देखील सामील होता. दहशतवादी संघटनांसाठी ओव्हरग्राउंड वर्कर्स म्हणून काम करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी उपराज्यपालांच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला होता.
देशद्रोहय़ांना समर्थन करणाऱया शासकीय कर्मचाऱयांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचा आदेश जम्मू-काश्मीर प्रशासनाने काढला होता. देशाचे सार्वभौमत्व, राज्यघटना आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरलेल्या घटकांचे समर्थन केल्यास शासकीय कर्मचाऱयांना नोकरी गमवावी लागणार असल्याचे आदेशात नमूद होते.









