दोन स्फोटांमध्ये 34 जणांचा मृत्यू
काबूल
तालिबानसोबत शांतता चर्चा सुरू असतानाही अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले होण्याचे सत्र कायम आहे. रविवारी दोन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये किमान 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठय़ा संख्येने लोक जखमी झाले आहेत. पहिला स्फोट अफगाणिस्तानातील एका सैन्यतळाला लक्ष्य करत घडवून आणला गेला होता. तर दुसऱया स्फोटाद्वारे प्रांतीय परिषदेच्या प्रमुखाला ठार करण्याचा प्रयत्न झाला आहे. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला सैन्यतळावर नेत स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 31 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाल्याची माहिती पूर्व गजनी प्रांताच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
दक्षिण अफगाणिस्तानच्या जुबल येथे आत्मघाती दहशतवाद्याने एका कारद्वारे प्रांतीय परिषदेच्या ताफ्याला लक्ष्य केले आहे. या स्फोटात किमान 3 जणांचा मृत्यू ओढवला असून 12 जण जखमी झाले आहेत. प्रांतीय परिषदेचे प्रमुख मात्र या स्फोटातून सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ ईजा झाली आहे.









