वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, गृहखरेदी जोमात
प्रतिनिधी/ बेळगाव
दसऱयाचा मुहूर्त साधत वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबतच घर खरेदी रविवारी जोमात सुरू होती. 7 महिन्यांपासून आलेली मरगळ दूर करत बाजाराने गती घेतली. यामुळे थंडावलेल्या बाजारामध्ये दसऱयाच्या मुहुर्तावर कोटींची उलाढाल झाल्याने दिसून आले.
वर्षभर वाहन खरेदी करण्यात येत असते. परंतु मुहुर्तावर खरेदी करणाऱया ग्राहकांची संख्या काही कमी नाही. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱया दसऱयादिवशी मोठय़ा प्रमाणात वाहने खरेदी करण्यात येत असतात. गाडय़ा उपलब्ध होणार नाहीत त्यामुळे आठवडाभरापूर्वीच ग्राहकांनी वाहनांचे बुकिंग केले होते. यामुळे वाहने कमी पडल्याने अनेकांनी दिवाळीसाठी आतापासूनच बुकिंग करून ठेवले आहे. दुचाकी वाहन खरेदी मोठय़ा प्रमाणात वाढली असून दिवाळीपर्यंत ती अजून वाढण्याची चिन्हे आहेत.
लहान कारला ग्राहकांची पसंती
अधिक किमतीच्या दुचाकी घेण्यापेक्षा त्यात अजून काही पैसे जमवून लहान कार घेण्याकडे ग्राहकांचा ओढा होता. त्यामुळे लहान कारच्या शोरूममध्ये गर्दी दिसून येत होती. मोठय़ा कारलाही प्रतिसाद उत्तम होता. परंतु बजेटमध्ये असणाऱया लहान कारला पहिली पसंती मिळत होती. वाहन कंपन्यांनी ऑफर्स देत खरेदी वाढेल यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे कोरोनाची मरगळ दूर होऊन खरेदी जोरात सुरू झाली आहे.
घर खरेदी जोमात
दसऱयाच्या मुहुर्तावर अनेकांनी आपल्याला हव्या असणाऱया परिसरात घरांसाठी बुकिंग केले. काहींना या मुहुर्तावर घराचा ताबा घेतला. गृहनिर्माण क्षेत्राला यामुळे पुन्हा उभारी मिळणार आहे. गृहनिर्माण प्रकल्पांनी दसऱयानिमित्त ऑफर्स ठेवून कमी किमतीत घरे मिळवून दिल्याने घर खरेदी जोमात असल्याचे दिसून आले.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री वाढली
दसऱयादिवशी इलेक्ट्रॉनिक्स बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, होम थिएटर, मोबाईल अशा साहित्याच्या खरेदीत वाढ झाली. कंपन्यांनी घरघशीत सुट दिल्यामुळे खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनानंतर प्रथमच असे चित्र पाहायला मिळाल्याचे व्यापारी सांगत होते.









