ऑनलाईन अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
गतवषीपासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान शैक्षणिक वर्षाला उशिराने सुरुवात झाल्याने विद्यार्थी देखील बसपास मिळविण्यास निरुत्साही असल्याचे दिसत आहेत. जुन्या बसपासची मुदत 26 सप्टेंबरला संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा तिकीटवरच प्रवास सुरू आहे. विद्यार्थी, शाळा आणि परिवहन मंडळ यांच्यात समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळण्यास विलंब होत आहे. रविवारपासून शाळा-महाविद्यालयांना दसरा सुटी घोषित करण्यात आली आहे. मात्र या काळात बसपासची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याबरोबर संबंधित कागदपत्रे बसपास विभागात जमा करून बसपास मिळवावेत, असे आवाहन देखील परिवहनने केले आहे.
मागील महिनाभरापासून ऑनलाईन बसपास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र विद्यार्थी बसपास मिळविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जुन्या बसपासची मुदत संपल्यामुळे आता विद्यार्थ्यांना तिकीटवर प्रवास करावा लागत आहे. दरम्यान शाळांना 10 दिवसाची दसरा सुटी सुरू झाली आहे. या काळात विद्यार्थ्यांना बसपास मिळण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी सेवा सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून संबंधित कागदपत्रे शाळा-महाविद्यालयात जमा करावीत, विद्यार्थ्यांनी जमा केलेली कागदपत्रे शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांनी किंवा कर्मचाऱयांनी बसपास विभागात जमा करायची आहेत. आलेल्या अर्जाची छाननी करून बसविभागातच बसपासचे वितरण केले जात आहे. मागील वर्षापासून बसपास प्रक्रिया ऑनलाईन केल्याने विद्यार्थ्यांना ती त्रासदायक ठरत आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना बसपास मिळण्यास उशीर होत आहे. तसेच ही प्रकिया किचकट व वेळखाऊ असल्याने विद्यार्थी देखील दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे बसपास मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.









