चिपळूणच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला
प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडी आणि इतिहासाचे साक्षीदार ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष, दलित मित्र तात्या उर्फ रघुवीर भास्कर कोवळे (97) यांचे मंगळवारी वडनाका येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने चिपळूणच्या इतिहासाचा एक साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
तात्या सध्याच्या परांजपे हायस्कूल म्हणजे पूर्वीच्या श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांच्या वडनाका येथील ‘राजगृह’ निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिली होती. डॉ. आंबेडकर यांचा सहवास त्यांना लाभला होता. तात्या स्वातंत्र्यसैनिक होते.
चिपळूण शहरातील विविध संस्थांशी ते संबंधित होते. उत्तम वक्ते व लेखक असा त्यांचा लौकीक होता. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध संस्थांसह व्यक्तींनी शोक व्यक्त केला. सायंकाळी रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.









