इंदोर शहरातील प्रकार : डॉक्टरांच्या पथकावर झाला होता हल्ला
मध्यप्रदेशात इंदोर शहर कोरोना संसर्गाने सर्वाधित ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी पोहोचले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. परंतु दगडफेक झालेल्या भागातच कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आले आहेत. इंदोरच्या टाटपट्टी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागानुसार 16 नवे रुग्ण आढळले असून यातील 10 जण टाटपट्टी बाखल भागातील आहेत. तर रुग्णांचे वय 29 ते 60 वर्षांदरम्यान आहे. डॉक्टरांच्या पथकावर जमावाने हल्ला केला होता. डॉक्टरांनी तेथून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचविला होता. दगडफेक दर्शविणारी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती.
महिला डॉक्टरवर हल्ल्याप्रकरणी 13 जणांना अटक झाली आहे. आरोपींना चिथावणी देणाऱया व्यक्तीचे नाव तसेच 10 अन्य आरोपींची ओळख पटली आहे.
समोसेवाली चाची
चाचीने (काकी) चिथावणी दिल्यानेच हा हल्ला झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलीस आता या समोसेवाली चाचीचा शोध घेत आहेत. डॉक्टरांचे पथक मुबारिक या व्यक्तीच्या आईच्या (समोसेवाली चाची असे टोपणनाव) घरात स्क्रीनिंग करत होते. स्क्रीनिंगवेळी संबंधित महिलेने आरडाओरड करत डॉक्टरांना धमकाविले होते.









