प्रतिनिधी/ बेळगाव
गोवा वेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे धारकाने पाच लाखाचे भाडे थकविल्याने गाळय़ाला टाळे ठोकण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या महसूल विभागाने राबविली. तसेच टिळकवाडी भाजी मार्केटमध्ये तीन गाळय़ाला टाळे लावले. गाळय़ाचे भाडे थकविणाऱयां वर कारवाईचा सपाटा मनपाने सुरू ठेवला आहे.
विविध व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी दोन वर्षापासून भाडे भरले नसल्याने ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी दोन गाळे धारकांवर कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी आणखीन एका गळय़ावर कारवाई करण्यात आली. मनपाचे पाच लाख रुपये भाडे भरले नसल्याने ही कारवाई करण्यात आली. टिळकवाडी कला मंदिर शेजारी भाजी मार्केट मधील 3 गाळे धारकांकडे सहा लाख रुपये भाडे शिल्लक आहे. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या गाडय़ांना देखील टाळे ठोकण्यात आले . ही कारवाई करताना महापालिकेचे महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, महसूल निरीक्षक मल्लकार्जुन गुंडापन्नावर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.









