30 सप्टेंबरपर्यंत शिल्लक बिल भरण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारने गृहज्योती योजनेंतर्गत घरगुती वीजग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना सुरू केली आहे. परंतु, सरासरीपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मागील दोन महिन्यांत बिल देण्यात आले. ग्राहकांनी अद्याप ते बिल भरलेले नाही. जे ग्राहक 30 सप्टेंबरपूर्वी मागील थकबाकी भरणार नाहीत, त्यांना पुढील महिन्यात गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
राज्य सरकारने सत्तेत येताच पाच गॅरंटी योजना घोषित केल्या होत्या. त्यापैकी गृहज्योती योजना घरगुती ग्राहकांसाठी लागू करण्यात आली. ग्राहकाने मागील वर्षभरात वापरलेल्या विजेची सरासरी काढून युनिट निश्चित करण्यात आले. त्यापेक्षा अधिक वापर करणाऱ्या ग्राहकांना किरकोळ बिले देण्यात आली. काहीजणांची तर 1 ते 2 रुपयेदेखील विद्युतबिले आली होती. परंतु, ग्राहकांनी इतक्या कमी किमतीचे बिल कसे भरायचे? म्हणून बिलच भरले नव्हते.
काही ग्राहकांचे संपूर्ण विद्युतबिलच माफ झाल्याचा संभ्रम झाल्याने त्यांनी बिल भरले नाही. परंतु, मागील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना पुढील महिन्यात गृहज्योतीचा लाभ मिळणार नसल्याचे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आपली थकबाकी हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्रांवर जाऊन भरावी लागणार आहे. अद्याप ज्यांनी बिल भरले नाही, त्यांनी बिल भरून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे.