प्रतिनिधी/ बेळगाव
एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे सगेसोयरे, नातेवाईक, मित्र परिवार अंत्यविधीसाठी जमतात. अत्यंत शोकाकुल वातावरणात व आदरयुक्त भावनेने मृतात्म्यांना अखेरचा निरोप दिला जातो. कोरोना महामारीमुळे मृतात्म्यांना मिळणारा अखेरचा सन्मानही मिळेनासा झाला आहे.
जेसीबीने भले मोठे खड्डे खणून सात-आठ मृतदेह एकदाच दफन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बेळगावातही कोरोनाबाधितांच्या वाटय़ाला विटंबनाच येत असल्याची माहिती उपलब्ध झाली असून यासंबंधीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
सिव्हिल हॉस्पिटल किंवा इतर इस्पितळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाबाधितांवर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ही जबाबदारी महानगरपालिकेच्या यंत्रणेवर आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर प्रशासन संबंधितांना त्यांचा मृतदेह सोपवत नाही. जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्या त्या धर्माच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यास मुभा आहे. ही जबाबदारी महानगरपालिकेच्या यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारातून मृतदेह सदाशिवनगर स्मशानभूमीत नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वाटय़ाला मरणानंतरही अवहेलना येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न सुरू आहेत. मंत्री सी. टी. रवी यांनी तर कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास नियमानुसार अंत्यक्रिया करण्यास आपण स्वत: जाऊ, असे सांगत यासंबंधीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबीय, आप्तेष्टांना तर तेथे संधी नाही. सरकारी यंत्रणेला मृतदेहाचे सोयरसुतक नाही.
शासकीय नियमांनुसार अंत्यसंस्कार
यासंबंधी ‘तरुण भारत’ने आरोग्य खात्यातील एका वरि÷ अधिकाऱयाशी संपर्क साधला असता कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास कोणी तयार होत नाहीत. त्यामुळे शासकीय नियमांनुसार त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. सुरक्षितपणे नियम पाळून अंत्यसंस्कार करता येतो. यासंबंधीची भीती आधी दूर झाली पाहिजे. तरच मृतदेहांची विटंबना थांबणार आहे, असे या अधिकाऱयाने सांगितले.









