तीन दिवसांसाठी पुन्हा कोठडीत घेणार
प्रतिनिधी/ बेळगाव
भरदिवसा घरफोडी करताना थरारक पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आलेल्या जोडगोळीला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून त्यांना आणखी तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे.
प्रकाश विनायक पाटील (वय 37) मूळचा राहणार सरस्वती रोड, शहापूर सध्या राहणार साखळी-गोवा, निथाई कालिपद मंडल (वय 41) रा. पश्चिम बंगाल अशी त्यांची नावे आहेत. गेल्या रविवारी 6 डिसेंबर रोजी झाडशहापूरजवळ थरारक पाठलाग करत सशस्त्र टोळीतील या जोडगोळीला अटक करण्यात आली होती. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपासासाठी त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत घेतले होते.
सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. प्रकाश व निथाई यांनी सातहून अधिक घरफोडय़ा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
घरफोडय़ांच्या तपासासाठी त्यांना पुन्हा तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी या प्रकरणांचा तपास करीत आहेत. प्रकाश हा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यात चोऱया, घरफोडय़ा करणारा अट्टल गुन्हेगार असून थरारक पाठलाग करीत त्याला अटक करण्यात आली आहे.









