सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सातारा जिल्हा संघटनेचा इशारा, सातारा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची खाती सुरु करण्याची मागणी , सातारा जिल्हा कार्यालयासमोर कर्मचाऱयांचे आंदोलन
प्रतिनिधी / सातारा
राज्य शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱयांचे विविध प्रश्न सोडवण्यात कुचराई केल्याचा आरोप करत राज्यभरातील 1400 ग्रामपंचायतींनी बुधवारी आंदोलन केले. सातारा तालुक्यातील 119 ग्रामपंचायती या कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी प्रामुख्याने सातारा तालुक्यातील उरमोडी धरणग्रस्त नित्रळ, बनघर, कासरस्थळ, लुमणेखोल, कातवडी या पाच ग्रामपंचायतींची खाती गेल्या अकरा वर्षांपासून गोठवण्यात आली आहेत. ते पुन्हा सुरू करावे यासह इतर मागण्या केल्या होत्या. या पाच ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होतात, सदस्य बॉडी व सरपंच निवडून येतात मात्र शासकिय फंड उपलब्ध होत नसल्याने सर्व कारभारी फक्त नामधारीच राहतात. ह्या पाच ग्रामपंचायती गेल्या 11 वर्षांपासून विकासापासून वंचित राहिली आहेत. म्हणून ह्या अधिवेशना दरम्यान हि गोठवलेली खाती सुरु करा. विकासनिधी सुरु करा अन्यथा या पाच ग्रामपंचायतीसाठी तसेच अन्य मागण्यांसाठी मंत्रालयांसमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सातारा जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
तसेच पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा लाक्षणीक एकदिवशीय संपा अंतर्गत सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सातारा जिल्हा कार्यालयाच्या समोर उभे राहून शासनाचा काळ्या फिती बांधून निषेध करत काम बंद आंदोलन करण्यात आले. या बंदला जिल्ह्यातून पाठिंबा मिळाला, बुधवारपासुन राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून ग्रामपंचायत कर्मचाऱयांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.









