ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे यावरुन केंद्र आणि योगी सरकारची नियत कळाली. सत्ता आहे म्हणून काहीही करणार का, अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराबद्दल संताप व्यक्त केला.
दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी लखीपूर खेरीतील घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भाजपाशी संबंधित लोकांनी गाडीखाली चिरडणे हा सरळसरळ शेतकऱ्यांवरचा हल्ला आहे. यावरुन केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारची नियत कळाली. सत्ता आहे म्हणून काहीही करणार का? शेतकऱ्यांचा आवाज अशा पद्धतीने दाबता येणारा नाही. घडलेल्या घटनेला केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारच जबाबदार आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वात सखोल चौकशी केली गेली पाहिजे. आरोपींना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, या घटनेवर अद्याप पंतप्रधान मोदींनी कोणतेही भाष्य केले नाही. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार संवेदनशील नाही. त्यामुळे जालियनवाला बागमध्ये जशी परिस्थिती झाली होती तशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे, असेही पवार म्हणाले.