महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-
उषेच्या महालात अचानक दाखल झालेल्या बाणासुराने तिथे अनिरुद्धाला पाहिले. अनिरुद्ध कामावतार प्रद्युम्नाचा पुत्र होता. त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनात दुसरा कोणी नव्हता. त्याच्या सावळय़ा शरीरकांतीवर पीतांबर शोभत होता. लांब बाहू होते. कमलदलाप्रमाणे डोळे, कुरळे केस, कुंडलांची दीप्ती आणि मंद मंद हास्ययुक्त नजर यामुळे मुखाचे सौं?दर्य काही आगळेच दिसत होते.
सर्व माङ्गल्यें मंगलभरिता । ऐसी उषा जे प्रियतम कान्ता । तिच्या स्तनकुंकुमें रंजिता । सुमनमाळा ज्या कंठीं।सुरतरंगालिङ्गनकाळीं। माळा रुळतां कुचमंदळीं । कुचकुंकुमें सुरंग झाली । ते वक्षस्थळीं जो मिरवी। मधुमासोद्भव मल्लिकासुमनें। तत्कृतमाळा कुचसंलग्न। कुङ्कुमलग्नें शोणायमानें। लांछितचिन्हे प्रकाशती । तिये प्रियतमेसी निकट । अग्रभागीं बैसूनि नीट । खेळत असतां सारीपाट । बाण प्रकट त्यां देखे । त्यातें देखोनि विस्मित बाण । म्हणे हा उद्धट धीट कोण । मम कन्येसीं अंगसंलग्न। न धरी मरणभय पोटीं । ऐसा अनिरुद्ध बाणासुरें । देखूनि विस्मित निजान्तरें । बाणासुरातें देखिलें येरें । तेंही श्रोते अवधारा ।
त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेषभूषा केलेल्या प्रियेबरोबर द्यूत खेळत होता. मोगऱयाचा हार त्याच्या गळय़ात होता आणि त्या हाराला ऊषाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने तिच्या वक्षस्थळाचे केशर लागले होते. त्याला ऊषेच्या जवळच बसलेला पाहून बाणासुर आश्चर्यचकित झाला.
परमप्रतापी महाशूर । बाणभोजनीं पंक्तिकार । वसनाभरणें अलंकार । ज्यां दे असुर निजसाम्यें ।
ऐसे भरंवशाचे जे वीर । परम निर्दय महाक्रूर । तिहेंसी वेष्टित बाणासुर । कन्यागार प्रवेशला । तो अनिरुद्ध देखूनि त्यातें । उदायुध आततायीही भोंवतें । सन्नद्ध बद्ध शतानुशतें । काय करिती तें अवधारा। अकस्मात वेष्टित भटीं । उषेनें बाण देखिला दृष्टी । धाकें धडकी भरली पोटीं । पाहे गोरटी वरवत्रीं । तंव तो प्रतापी माधव वीर । सुभटवेष्टित बाणासुर। देखूनि क्षोभला प्रळयरुद्र । परिघ सत्वर घेऊनी । वैकुंठकंठीरवाचे पोटीं । वीर प्रद्युम्न प्रतापजेठी । विधि हर साहूं न शकती काठी । तेथें कैं गोठी इतरांची । तया प्रद्युम्नाचा बाळ । अनिरुद्ध प्रतापी प्रळयानळ । देखूनि बाणासुराचें दळ। परिघ विशाळ पडताळी। लोहामाजी वज्रतुल्य। विद्युत्पातावशिष्ट शल्य। मुरनामक लोहगोळ । परिघ विशाळ तत्कृत जो ।
तो मौर्व परिघ पडताळूने । जैसा अंतक दण्डपाणि ।
करावया प्राणहानि । सज्ज होऊनि राहिला । करावया भूतसृष्टीचा अंत । दंड धरी जेंवि कृतान्त । तेंव अनिरुद्ध परिघेंसहित । समरा व्यवस्थित राहिला।
तिये समयीं निकट वीर । प्रेरिता झाला बाणासुर ।
म्हणे धरा मारा बांधा चोर । कन्यागारप्रवेशक ।
ऐकोनि बाणासुराची गोठी । आततायी सुभट हठी ।
अनिरुद्धावरी लोटले कपटी । शस्त्रें मुष्टी कवळूनी ।
वीर प्रवर्तले मारामारी । देखूनि अनिरुद्ध काय करी ।
तें तूं कुरुवर्या अवधारिं । स्वस्थ अंतरिं होवोनी ।
Ad. देवदत्त परुळेकर








