प्रतिनिधी /मडगाव
केपे तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड काबाड कष्ट करून पावसाळय़ात भाजीच्या मळय़ाची लागवड करतात. काकडी, धोडगी, काटे कणगां, भेंडी, चिबुड, भोपळा, कोयते वाल, वाल, गोड कारांदे, कुवाळे, मिरची इत्यादीचे उत्पन्न या शेतकऱरयांकडून घेतले जाते. गणेश चतुर्थी व त्यानंतर त्यांच्या मळय़ांना बहर येत असतो. शेतकरी महिला आपला भाजीपाला घेऊन मडगावच्या बाजारपेठेत येतात. पण, त्यांना बसण्यासाठी हक्काची अशी जागा नसल्याने त्यांना रस्त्याच्या बाजूला बसूनच आपल्या भाजीपाल्याची विक्री करावी लागते.
मडगाव शहरात पोलीस स्थानकाच्या समोर तसेच फातोडर्य़ात रवींद्र भवनजवळ या शेतकरी महिला रस्त्याच्या बाजूला बसून आपला व्यवसाय करतात. भल्या सकाळी बस पकडून या महिला शहरात येत असतात. संध्याकाळी त्या परतीचा मार्ग धरतात. या शेतकरी महिलांकडे अस्सल गावठी मिरची, वाल, काकडी, चिबुड, काटे कणगां, भेंडी व धोडगी मिळत असल्याने त्यांच्या भाजीपाल्याला चांगली मागणी असते.
मडगावहून काणकोणला जात असताना वाटेत सुबदळे, बार्से इत्यादी भागात त्या ठिकाणातील स्थानिक महिला आपल्या भाजीपाल्याची विक्री करतात. मडगाव शहरात येणाऱया महिला या बहेतुक बार्से, बेंदुर्डे, अडणे-बाळळी, घोडके, मोरपिर्ला, आंबावली इत्यादी भागातून येत असतात. सप्टेंबर, ऑक्टोंबर व नोव्हेंबर असे तीन महिने त्यांना उत्पन्न मिळत असते. मात्र, त्यांना शहरात बसण्यासाठी हक्काची जागा नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असते. रस्त्याच्या बाजूला बसून त्यांना व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या जीवाला देखील कायम धोका असतोच.
आश्वासने अनेक पण पुर्णत्वाचा अभाव
केपे तसेच सभोवतालच्या ग्रामीण भागातून येणाऱया गरीब शेतकरी महिलांना आपल्या भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची आश्वासने राजकारण्यांनी आजवर अनेकदा दिली आहेत. त्यांच्यासाठी शेड बांधून दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र, या आश्वासनाची पूर्तता मात्र होत नाही. या शेतकरी महिलांना कायम स्वरूपी शेड बांधून दिल्यास त्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. मडगाव नगरपालिकेने देखील एक पाऊल पुढे टाकत त्यांना शेड बांधून देण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. या महिलांकडून सोपो कराच्या माध्यमांतून पालिकेला महसूल प्राप्त होऊ शकतो.









