ऑनलाईन टीम/तरुण भारत
रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. आत संजय राऊत यांनी देखील त्यांच्या खास शैलीमध्ये भाजपावर निशाणा साधला आहे. “शिवसंवाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. “एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल. यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. जे करतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की यांची लाकडं रचली गेली आहेत. त्यांना राजकारणातून कायमचं हे राम म्हणावं लागेल”, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली आहे.
भाजपने कोणाच्याही मागे ईडीच्या कारवाया लावल्या तरी त्यांची लाकडं ही राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. त्यांना लवकरच ‘हे राम’ म्हणावं लागेल असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खरंतर, मंगळवारी ईडीने पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे बंधू तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे.