वादळी पावसाचा तडाखा, बागायतदारांचे मोठे नुकसान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावात निर्माण झालेल्या चक्रावाताने 200 हून अधिक पोफळीची झाडे व आंबा कलमे जमिनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. मात्र शनिवारी या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र होते. सकाळपासूनच चांगलीच उघडीप पडल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला. मात्र शुक्रवारी या वादळी पावसाने तोणदे गावात बागायतदार शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसासोबत चक्रावात निर्माण झाल्याने अनेक वर्षांपासून जिवापाड जपलेल्या पोफळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. 200 हून अधिक पोफळीची झाडे क्षणार्धात जमीनदोस्त झाली. अनेक आंबा कलमेही मुळासकट उन्मळून पडली आहेत.
कोकणातील अनेक शेतकऱयांचा उदरनिर्वाह नारळी-पोफळीच्या झाडांवर अवलंबून असतो. नारळी-पोफळीतून मिळणाऱया उत्पन्नातून वर्षाची बेगमी केली जाते. मात्र, यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रत्नागिरीतील गुहागर, दापोली, मंडणगडला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे येथील अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यानंतर आताही जिह्याच्या काही भागातला वादळी-वाऱयाचा फटका बसत आहे. रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावात झालेल्या या नुकसानीने तेथील शेतकऱयांनी डोक्याला हात टेकले आहेत. वर्षानुवर्षे जपलेली पोफळीची झाडे जमिनदोस्त झाल्याने कुटुंबाचा उदर्निवाह कसा भागवायचा, असा प्रश्न बागायतदार शेतकऱयांना पडला आहे.
यावर्षी जिह्यात प्रारंभापासून समाधानकारक पर्जन्यमान झालेले आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात सरासरी 1607 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून सर्वाधिक पाऊस राजापूर आणि दापोली तालुक्यात झाला आहे. राजापूरमध्ये 1854 मिमी, तर दापोलीत 1800 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागरमध्ये 1704 मिमी आणि लांजा तालुक्यात 1698 मिमी पावसाची नोंद झाली आहे.









