पर्यावरणप्रेमी नागरिकांचा सवाल : स्मार्ट सिटीसाठी झालेली कत्तल कशासाठी?
बेळगाव /प्रतिनिधी
बेळगावचे स्मार्ट सिटीत रुपांतर होत आहे. विविध रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी झाडांची बेसुमार कत्तल करण्यात येत आहे. यामुळे शहराचे रूप स्मार्ट होण्याऐवजी कुरूप बनत चालले आहे. सिटिझन कौन्सिलने तसेच इतर संघटनांनी ही कत्तल करू नका, अशी मागणी केली व प्रशासनाने हात वर केले. यामुळे आता हे वृक्ष तोडले कोणी, कशासाठी आणि तोडलेले वृक्ष आहेत तरी कोठे? असा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
सर्वसामान्य नागरिक, पर्यावरणी आणि जागरूक समाजातून हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशीधर कुरेर यांनी आपल्यालाही वाईट वाटले, असे मत या वृक्ष कत्तलीवर बोलताना व्यक्त केले आहे. त्यामुळेच झाडे तोडली कोणी? तोडलेल्या झाडांचे झाले काय? वृक्षतोड झाली हे वनविभागाला माहिती आहे का? माहिती असल्यास परवानगी दिली की नाही? तोडलेल्या वृक्षांचा आढावा कोण घेणार? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
वृक्षतोड करून भ्रष्टाचार चालू आहे का? याबद्दलही चर्चा सुरू असून हा भ्रष्टाचार थांबवण्याची मागणी होत आहे. तीन-चार पिढय़ांचे साक्षीदार असलेले डेरेदार वृक्ष रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरत असल्याने ते तोडण्यात आले. तोडलेल्या झाडांचे बुंधे पाहून वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त झाली. तसेच सिटिझन कौन्सिलच्यावतीने याबाबत स्मार्ट सिटीच्या संचालकांना निवेदनही देण्यात आले.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली हे वास्तव धोकादायक आहे. तसेच मध्यंतरी व्हॅक्सिन डेपो येथेही अनेक झाडांना आग लावण्याचे प्रकारही घडले. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी ओरड करून झाडांना संरक्षण दिले. मात्र पुन्हा एकदा झाडांची अमानुषपणे कत्तल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील झाडांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.
वनविभागाचा आशीर्वाद?
शहरातील इतकी झाडे तोडण्यामागे कोणाचे कटकारस्थान आहे? शहरातील हजारो छोटय़ा-मोठय़ा झाडांची कत्तल करण्यात आली. मग कत्तल करण्यात आलेल्या झाडांचे नेमके काय झाले? झाडांचे बुंधे गेले तरी कुठे? या सर्वाला कोणाचा वरदहस्त आहे का? वनविभागाने या सर्वांना आशीर्वाद दिला आहे का? असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहेत.
भ्रष्टाचार थांबविण्याची होतेय मागणी
शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली झाडे तोडून त्या लाकडांची थेट विक्री केली गेली आहे. तसेच झाडांच्या खोडापासून फळय़ा काढण्याचा घाट अनेकांनी चालविला आहे. मिल, अड्डे चालकांना ही झाडे कापून विक्री करत असल्याचा आरोप होत आहे. याची योग्य दखल घेण्याची गरज असून भ्रष्टाचार थांबविण्याचीही गरज आहे. झाडे थेट तोडून ती विकण्याच्या प्रकारात गुंतलेल्या सर्वांवरच कारवाईची गरज व्यक्त होत आहे.









