कुंती व पांडवांच्या अकाली निधनाबद्दल गांधारीने शोक प्रकट केला. बलराम व कृष्णाने तिचे सांत्वन केले. त्यानंतर ते कुरुकुलगुरु द्रोणाचार्यांकडे
आले.
तेथूनि आले द्रोणसदना । द्रोणें देखोनि रामकृष्णां। अश्रुपात आणिले नयनां । पाण्डुनंदना आठवोनी । पाण्डवांचे आठवी गुण । ठाणमाण रूप लावण्य । वीर्य शौर्य प्रताप गहन । धृति दाक्षिण्य औदार्य । धनुर्विद्येचा अभ्यास । प्रजापालनीं परमोह्लास । प्रागल्भ्य पाटव तेजोविशेष । विनय नम्रता सौजन्य । मर्यादेचे रत्नाकर । समरिं अचळ मेरु अपर । जवें जिंकीती पैं समीर । केवळ जळधर कपेचे। ऐसे स्मरोनि अगाध गुण । पाण्डवमोहें जाकळे द्रोण। म्हणे पार्थाऐसें छात्ररत्न । आता नयन न देखती । द्रुपद प्रतापी पाञ्चाळपति । अर्जुनें बांधोनि आणिला रथीं । गुरुदक्षिणे वोपूनि हातीं । दाविली ख्यति भूचक्रीं । धनुर्विद्येचा सागर । ऐसा शिष्य कैंचा अपर । जैसा भार्गव परशुधर । न भूतो न भविष्यति । तयातें म्हणती रामकृष्ण । हेंचि पाण्डवांचें कल्याण। गुरुंच्या वदनें ज्यांचे गुण । ऐकती श्रवण जनांचे । हेंचि जन्माचें सार्थक । ज्यातें धन्य म्हणती लोक । शताब्द वांचोनि पासकपंक । चर्चित मूर्ख भूभार । ऐसिया अनेक मधुरोत्तरिं । द्रोणा संबोखूनियां हरि । मग पातलें सभागारिं । वृद्धाचारा अनुसरले ।
बलराम व कृष्ण यांना पाहताच पांडवांची आठवण येऊन द्रोणांच्या डोळय़ात पाणी आले. पांडवांचे गुण त्यांना आठवू लागले. पांडव रूपवान, सुंदर होते. पांडव शूर, वीर, धैर्यवान, प्रतापी व उदार होते. द्रोणांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचा त्यांनी एकाग्रतेने परिश्रमपूर्वक अभ्यास केला. प्रजापालनात ते दक्ष होते. ते अत्यंत विनम्र होते. असे पांडवांचे अनेक गुण द्रोणांना स्मरत होते. विशेष करून अर्जुनावर द्रोणांचे निस्सिम प्रेम होते. त्यांच्या सर्व शिष्यांमध्ये तो अत्यंत लाडका होता. द्रोणाचार्य पार्थाची आठवण काढून बलराम व कृष्णाला म्हणाले-पार्थासारखे रत्न आता या डोळय़ांना दिसणार नाही. असे म्हणताना त्यांच्या डोळय़ात पाणी आले. अर्जुनावर द्रोणांचे विशेष प्रेम होते, यालाही तसेच कारण होते. द्रोणाचार्यांना तो सारा घटनाक्रम आठवला. पांचाल देशाचा राजपुत्र द्रुपद व द्रोण यांनी एकाच गुरुच्या गुरुकुलात राहून विद्या संपादन केली. ते गुरुबंधू होते. द्रोणांचे पिता भारद्वाज हेच दोघांचेही गुरु होत.
गुरुकुलात एकत्र राहत असताना त्यांची विशेष मैत्री होती. दोघेही वेदशास्त्र व धनुर्विद्येत निपुण झाले. गुरुगृहातील शिक्षण पूर्ण झाल्यावर द्रुपद आपाल्या घरी परतला. लवकरच द्रुपद पांचाल देशाच्या राजसिंहासनावर बसला. आता तो पांचालाधिपती महाराजा द्रुपद बनला. द्रोणाचार्य मात्र वनातील झोपडीत राहणारे, तपाचरण करणारे ब्राह्मण होते. घरात दारिद्रय़ होते. दोघांचाही विवाह होऊन ग्रहस्थाश्रम सुरू झाला होता. कृपाचार्यांची बहीण कृपी ही द्रोणांची पत्नी. तिच्यापासून द्रोणाचार्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नांव द्रोणांनी अश्वत्थामा असे ठेवले. आपल्या एकुलत्या एक पुत्रावर द्रोणाचार्यांचे प्राणापेक्षा जास्त प्रेम
होते.








