श्रीकृष्ण व रुक्मिणी आंबा शिंपण्यासाठी आले. तो आम्रवृक्ष कसा होता? एकनाथ महाराज सांगतात-ओंकार हेच त्याचे मूळ होते. तो कृष्णधन निल वर्णाचा सुकुमार कोवळा होता आणि अर्धमात्रा वाढला होता. आगम निगम हीच त्याची पाने होती. वैराग्य मोहराची फुले त्यावर फुलली होती. श्रद्धेने तो पोसला होता. त्याच्या फुलांच्या सुवासाने मुमुक्षूरूपी भ्रमर त्याच्याकडे आकर्षिले जात होते. स्वानंदात मग्न असलेले संत त्याच्याकडे नित्य येत असल्याने तो नित्यनूतन होता. या वृक्षावर संतरूपी कोकीळ मौन सोडून निजबोधाचा टाहो फोडीत होते. सगळी फळे फळल्यानंतर हा आम्रवृक्ष फळतो. त्याच्या रसाचा स्वाद चाखण्यात अडचण येऊ नये म्हणून बाठ मात्र टाकून द्यावी लागते. अशा आंब्याचा मधुर रस सज्जन चाखतात. कृष्णाने रुक्मिणीला मांडीवर बसवले व दोघांनी आंबा शिंपला.
त्रिगुण गुणातीत जाण । तिसरे दिवशीं तेलवण। करूनि नोवरीसी अर्पण । वाणपालटण चतुर्थी । श्रीकृष्णासी वाणपालटण । नामरूपाचें वास संपूर्ण। स्थितिकाळासी देऊनि मान । लीला श्रीकृष्ण नेसला। वाणपालटण नोवरीस । अक्षयाचे सपूर वास। नेसोनियां सावकाश । निजसुखेसी वर्तती। वोहरें बैसवोनि वाडेंकोडें । समसाम्य वाहूनि साडे । ऐरणी विस्तारावया पुढें । शुद्धमती सावध । व्याही गौरवितां कौतुक । कृष्णासमान मानी भीमक । सकळिकां देऊनि सुख । एकेंएक गौरविलें । भीमकें मांडिलें विंदान । भवऐरणी संपादून । कृष्णासी वंशपात्रदान। विधीविधान वेदोक्त । वंश विस्तारितां सुख । सोळा कळांचे सोळा कर्क । प्रकृतिस्वभाव सुपल्या देख। ज्ञानदीपें सोज्वळ । शुद्धमतीनें तत्त्वता। एका जनार्दन पाहतां । वंश ठेविला कृष्णसमर्था । जुनाट कथा परिसिजे । पूर्वी पितामहाचा पिता । तयासी प्रसन्न सुभानु होता । तेणें भानुदासें वंश सरतां । केला तत्त्वता हरिचरणीं । प्रल्हादाचे कृपेसाठीं । बळींचें द्वार राखी जगजेठी । तैसीच हेही आहे गोष्टी । कृपादृष्टी कृष्णाची । सांगतां वंशपात्रदान। लागलें निजयशाचें अनुसंधान ।
आमुचे वंशी वरदान। परम भक्त कृष्णाचे । मी जन्मलों धन्य वंशीं। म्हणोनि हरिभक्ति आम्हांसी । संत सोयरे निजमुखासी ।
वंश कृष्णासी निरविला । जें जें जयासी निरविलें। तेणें तें पाहिजे सांभाळिलें । आमुचें चाळकपण कृष्णासी आलें । कांसे लाविलें जनार्दन ।
कथेसी झाली आडकथा । म्हणोनि न कोपावें श्रोतां ।
धेंडा नाचवील कृष्णनाथा । रसाळ कथा पुढें आहे।
आंबा शिंपण्याच्या विधीनंतर तेलवण, वाणपाटलण व वंशपात्रदान हे विधी यथासांग पार पडले. वंशपात्रदानाचे वर्णन करताना एकनाथ महाराजांना आपल्या वंश परंपरेचे स्मरण झाले. भानुदास हा अत्यंत श्रे÷ भगवंताचा भक्त या वंशात होऊन गेला. त्याने आपला वंश हरिचरणी सरता केला. कृष्णभक्तीच्या मार्गाला हा वंश लागला.
देवदत्त परुळेकर