प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील तुये येथील श्री देवी भगवती पंचायतन देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर उत्तम नाईक तुयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानच्या 2022 ते 2025 पर्यंतच्या तीन वर्षांसाठीच्या संपूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
]रविवारी देवस्थान समितीच्या निवडणूकीला मोठय़ा संख्येने महाजनांची उपस्थिती होती. सर्व महाजनांनी समोपचाराने चर्चा करून नुतन देवस्थान समितीची निवड करण्याचा निर्णय घेतला. यावेळी निवडण्यात आलेल्या समितीत चंद्रशेखर उत्तम नाईक तुयेकर(अध्यक्ष), सत्यवान अर्जून नाईक(उपाध्यक्ष), दत्तात्रय तुकाराम नाईक (सचिव), सिद्धी कृष्णा नाईक (उपसचिव), रोहीदास चंद्रोजी नाईक (मुख्यत्यार), संतोष गजानन नाईक (उपमुख्यत्यार), प्रकाश गंगाराम नाईक(खजिनदार), सार्थक रामा नाईक (उपखजिनदार) तर सभासदपदी- विष्णू उर्फ रवी बाबु नाईक, वसंत आबु नाईक, राघोबा सदू नाईक, दामोदर सहदेव नाईक, उमेश न्हानू नाईक, उमेश सगुण नाईक, सागर मर्तो नाईक आणि समीर सुखाजी नाईक यांची निवड करण्यात आली.
उल्हास तुयेकर यांचे अभिनंदन
तुये गांवचे सुपुत्र तथा श्री देवी भगवती देवस्थानचे महाजन उल्हास तुयेकर हे नावेली मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्याने त्यांचे अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत घेण्यात आला. ज्ञानेश्वर उत्तम नाईक यांनी हा ठराव मांडला असता सर्व उपस्थित महाजनांनी त्याला समंती दिली. तुयेचा एक सुपुत्र नावेलीत जाऊन आमदार बनतो ही गांवासाठी फार अभिमानास्पद गोष्ट ठरल्याचे उदगार यावेळी व्यक्त करण्यात आले.









